सातारा : देगाव (ता. सातारा) येथे एकास उसाच्या दांडक्याने मारहाण करून जखमी करत त्याचा मोबाईल फोडला तसेच एका महिलेस धक्काबुक्क्याने मारहाण करत तिला ढकलून देण्यात आल्याची घटना शुक्रवार, दि. ५ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मिथून रामचंद्र साळुंखे, रामचंद्र साळुंखे आणि ट्रॅक्टरचालक असे तिघेजण ट्रॅक्टरमधून ऊस भरुन निघाले होते. यावेळी योगेश शंकर साळुंखे (वय ३२, रा. देगाव, ता. सातारा) यांचे रस्त्यावर पीव्हीसी पाईपचे काम चालू होते. ट्रॅक्टर या मार्गावरुन निघाला असताना योगेश साळुंखे यांना त्या तिघांना थांबवत जर यावरुन ट्रॅक्टर गेला तर पाईपलाईनचे नुकसान होईल, अशी विनंती केली. याचा राग आल्यामुळे मिथून साळुंखे याने योगेश यांना उसाच्या दांडक्याने मारहाण करत त्याच्या हातातील मोबाईल फोडून टाकला. याचवेळी रामचंद्र साळुंखे आणि ट्रॅक्टरचालकाने योगेश यांना हात, लाथाबुक्क्याने मारहाण केली. योगेश यांच्या पत्नी नीता यांनाही हाताने धक्काबुक्की करत ढकलून दिले. या घटनेनंतर योगेश यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार राजू मुलाणी हे करत आहेत.