फ्यूज बॉक्स उघडे
परळी : सातारा तालुक्यातील अनेक गावामधील फ्यूज बॉक्स उघड्या अवस्थेत आहेत. त्याच्या शेजारीच मानवी वस्ती असून सभोवतालीच लहान मुले खेळत असतात. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून उघड्या फ्यूजबॉक्सला दरवाजे बसवावेत, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांतून केली जात आहे.
वाटाणा स्वस्त
सातारा : सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीत वाटाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे वाटाण्याचे दरही कमी झालेले आहेत. साताऱ्यातील राजवाडा, मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील बाजारात वाटाणा सरासरी चाळीस रुपये किलो दराने विकला जात आहे. त्यामुळे त्यांना मागणीही चांगलीच वाढत आहे. शेतकऱ्यांना पैसाही मिळत आहे.
विनामास्क वावर
वडूज : खटाव तालुक्यातील ग्रामस्थांची कोरोनाबाबतची भीती कमी झालेली आहे की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. ग्रामीण भागातून वडूजमध्ये येणारे बहुतांश तरुण तोंडाला मास्क न बांधताच येत असतात. समोर पोलिसांची गाडी दिसल्यानंतर तेवढ्या पुरते तोंडाला रुमाल बांधले जात आहेत. त्यामुळे कोरोना धोका वाढण्याची शक्यता वाढत आहे.
पाण्याचा जास्त वापर
सातारा : शहराच्या लगत असणाऱ्या अनेकजण महादरे तलावात वाहने धुण्यासाठी नेत असतात. मात्र बहुतांश जणांनी सोसायटीतील साठवण टाकीतून गाड्या धुतल्या. यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर झाल्याने काही नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
अपघातात वाढ
सातारा : सातारा शहरातील रस्ते हे चढ उताराचे आहेत. चढावून वाहनांचा वेग जास्त असतो. रस्त्याच्या कडेलाच असलेल्या घरातून लहान मुले रस्त्यावर अचानक येतात. त्यामुळे अनुचित प्रकार घडू नयेत, म्हणून ग्रामस्थांनी उंचवटे करून गतिरोधक तयार केले आहेत.
क्षेत्र माहुलीजवळ खड्डे
सातारा : कोरोना लॉकडाऊनपूर्वी सातारा-लातूर महामार्गाच्या कामासाठी क्षेत्र माहुली ते कृष्णा नदीपूल दरम्यान सुमारे ७०० मीटर रस्ता खाणून पडला असून, त्यामध्ये आज अक्षरश: तीन ते चार फुटांचे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या ठिकाणी दररोज अपघातासारख्या घटनेत वाढ होत आहेत.
वन्य प्राण्यांचा वावर
बामणोली : कास परिसरात तरस या वन्य प्राण्यांचा वावर वाढला असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
पुलाखाली अतिक्रमण
कोरेगाव : शहरात मोठ्या संख्येने मोकाट गायींचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. शहरातील दुभाजकांवरतीच या मोकाट गायी बसत असल्याने त्यांचा रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अडथळा होत आहे. परिणामी वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
स्वच्छतागृहाचा अभाव
सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कित्येक किलोमीटर अंतरात सार्वजनिक स्वच्छतागृह नाहीत. त्यामुळे खासगी वाहनातील प्रवाशांची गैरसोय होत असते. यासाठी खासगी ढाबे किंवा महामार्गाकडेच्या पेट्रोलपंपावरील स्वच्छतागृहाचा आधार घ्यावा लागत आहे.
विनाकारण हेलपाटे
सातारा : सातारा शहराच्या उपनगरात असलेल्या अनेक स्वस्त धान्य दुकानदारांकडून ग्राहकांची अडवणूक केली जात आहे. रेशन दुकान उघडण्याच्या वेळेत ग्राहक त्यांचे काम बाजूला ठेवून आलेले असतात. तरी हे दुकान बंद असते. त्यामुळे विनाकारण हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.
सांडपाणी रस्त्यावर
खटाव : खटाव तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावात योग्य ती सुविधा राखली जात नसल्याने सांडपाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत संबंधित ग्रामपंचायतींनी काळजी घेण्याची गरज आहे.
मास्क खरेदीसाठी गर्दी
सातारा : जिल्ह्यातील पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग बुधवार (दि. २७) पासून सुरू होत आहेत. त्यामुळे मुले शाळेत जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून असंख्य पालक, मुलांसाठी मास्क, हॅण्डग्लोज, सॅनिटायझर खरेदी करण्यात मग्न आहेत. त्यासाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे.
कुत्र्यांमुळे दहशत
पेट्री : सातारा तालुक्यातील काही भागात कुत्र्यांची टोळकी मोठ्या प्रमाणावर वावरत असतात. त्यांच्याकडून माणसांवर हल्ले होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
बटाटा स्वस्त
सातारा : साताऱ्यातील महात्मा फुले भाजी मंडईत रविवारी झालेल्या आठवडे बाजारात बटाट्याचे दर कमी झाल्याचे अनुभवास मिळाले. त्यामुळे बटाटे तीस रुपयांना दोन किलो मिळत होते. साहजिकच बटाटे खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती.
उकाड्यात वाढ
सातारा : साताऱ्यासह ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून थंडी गायब झाली आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. घराघरांत आतापासूनच रात्रंदिवस पंखे सुरू ठेवावे लागत आहेत.