ढेबेवाडी : विभागातील अनेक गावांमध्ये सध्या कूपनलिका बंद स्थितीत आहेत. वेळेत दुरुस्ती न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. कूपनलिका दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
अस्ताव्यस्त पार्किंग
कऱ्हाड : येथील विठ्ठल चौकातील भगवान मारुतीबुवा मठाभोवती लोकांकडून आपल्या वाहनांचे अस्ताव्यस्त पार्किंग केले जात आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविक, नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. समस्येवर उपाय शोधण्याची मागणी होत आहे.
घरोघरी जनजागृती
कऱ्हाड : शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागातील महिलांसह स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमातील स्वच्छता दूत यांच्याकडून घरोघरी जाऊन महिलांना स्वच्छताविषयी मार्गदर्शन केले जात आहे. ओला व सुका कचरा कसा साठवावा, त्याचे कशाप्रकारे फायदे आहेत, अशी विविध माहिती महिला कर्मचारी यांच्याकडून दिली जात आहे.
वन्यप्राण्यांचा उपद्रव
सणबूर : पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागात सध्या तरस, लांडगा, रानडुक्करांचा उपद्रव वाढला आहे. या प्राण्यांकडून पिकांचे नुकसान होत आहे. प्राण्यांना हुसकावण्यासाठी ग्रामस्थांना पिकांची राखण करावी लागत असल्याची परिस्थिती आहे. वनविभागाने प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.