कऱ्हाड तालुक्यातील शिवरडे, कोणेगावच्या हद्दीमध्ये शेतकऱ्यांना कोणताही मोबदला न देता रेल्वे विभागामार्फत विस्तारीकरणाचे काम सुरू केले आहे. शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस न देता खासगी मोजणीदाराद्वारे शेतकऱ्यांच्या शेताची मोजणी रेल्वेचे ठेकेदार व अधिकारी करत आहेत. याबाबतची माहिती शेतकऱ्यांनी रयत क्रांती संघटनेचे नेते सचिन नलवडे यांना सांगितली असता सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन नलवडे यांनी मोजणीस्थळी जावून आपण शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस न देता, सरकारी मोजणी न करता, खासगी मोजणी का करत आहात? असे विचारले असता, रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन जमीन आमचीच असल्याचा दावा केला.
यावेळी नलवडे यांनी जमीन रेल्वेची असल्यास जमिनीचे कमी जास्त पत्रक, अवॉर्ड, कब्जेपट्टी, जुने जमीन खरेदी दस्त दाखविण्याची मागणी केली. मात्र, खरी कागदपत्रे न दाखवता रेल्वे अधिकारी शेतकऱ्यांना पोलिसांची धमकी देऊन निघून गेले. यावेळी सचिन नलवडे यांनी शेतकऱ्यांना बाधित जमिनीचा पूर्ण मोबदला दिल्याशिवाय काम सुरू करून देणार नसल्याचा इशारा दिला.
- कोट
कोणेगावच्या हद्दीमध्ये धोम धरण प्रकल्पग्रस्त शेतकरी महिला हिराबाई धर्मू गायकवाड यांना गट नं. ५४५ ची शेतजमीन १९८० मध्ये जिल्हा पुनर्वसन विभागामार्फत देण्यात आली आहे. मात्र, ती जमीन रेल्वेची असल्याची कागदपत्रे अधिकारी दाखवत आहेत. यावरूनच रेल्वेच्या बोगस कारभाराचा पर्दाफाश होत आहे. या घटनेची व काही सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची कागदोपत्री पुराव्यांसह उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आम्ही करणार आहोत.
- सचिन नलवडे
नेते, रयत क्रांती संघटना