पुसेसावळी : खटाव तालुक्यातील म्हासुर्णे येथे दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून म्हासुर्णेत कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र, प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे.
गावात सुमारे ५०हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. सध्या शासनाकडून कोरोना रोखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. म्हासुर्णेत मात्र कोरोनाचा कहर वाढतच आहे. प्रशासन मात्र याठिकाणी सुस्त असल्याचे दिसून येत आहे. दररोज सकाळी व संध्याकाळी गावात काही ठिकाणी गर्दी वाढत असल्याचे चित्र आहे. कोरोनाबाधित लोकांचा वावर गावात दिसत आहे. संशयित व लक्षणे असणारे रुग्ण तपासणीसाठी दवाखान्यात जाण्यास टाळाटाळ करत आहेत.
म्हासुर्णेत चार दिवसात दोन रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे भीतीचे वातावरण आहे. खटाव तालुक्यात सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण म्हासुर्णेत आहेत. सध्या गावातील लसीकरणामध्ये वाढ होणे गरजेचे आहे. गावात वेळेत लस उपलब्ध होत नाही व पहिला डोस घेऊन काही लोकांना १२५ दिवस होऊन गेले तरीही दुसरा डोस लस उपलब्ध झाला नसल्याने दुसऱ्या डोसपासून लोक वंचित आहेत. तसेच कोरोना तपासणी शिबिर गावात वारंवार घेणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकांना गावातच कोरोना तपासणी करणे सोयीचे ठरेल. यावर उपाययोजना कधी होणार व कोरोनाबाधित रुग्ण कधी कमी होणार? अशा यक्ष प्रश्न म्हासुर्णे गावातील जनतेसमोर निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी म्हासुर्णेतील ग्रामस्थांकडून होत आहे.