लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा पालिकेकडून गेल्या सव्वा वर्षात तब्बल तीन हजार ५५ मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. हिंदू व मुस्लिम समाजातील मृतांवर अंत्यसंस्कारासाठी पालिकेला ४ जून २०२१ पर्यंत तब्बल ७५ लाख ८८ हजार ६०० रुपये इतका खर्च आलेला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप झाल्याने याचा मोठा आर्थिक फटका पालिका प्रशासनाला बसला आहे.
सातारा जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार ८८७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाने प्रारंभी कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी सातारा नगरपालिकेच्या खांद्यावर सोपविली. तेव्हापासून आजपर्यंत पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी ही जबाबदारी सक्षमपणे पार पाडत आहेत. साताऱ्यातील संगम माहुली स्मशानभूमी व गेंडामाळ कब्रस्तान येथे कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. पालिकेकडून या कामी सतरा कर्मचाऱ्यांचे पथक नेमण्यात आले आहे. या पथकाने गेल्या सव्वा वर्षात एकही सुट्टी न घेता तब्बल ३ हजार ५५ कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार केले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांबरोबर मृतांची संख्यादेखील यंदा वाढली. या मृतांवर पालिका प्रशासनाकडूनच अंत्यसंस्कार करण्यात आले. आतापर्यंत अंत्यसंस्कार केलेल्या ३ हजार ५५ मृतांवर पालिकेला तब्बल ७५ लाख ८८ हजार ६०० रुपये इतका खर्च आलेला आहे. हा खर्च अजूनही सुरूच आहे. जिल्ह्यात कोरोनाचा कोप झाल्याने त्याचा मोठा आर्थिक फटका पालिकेसह जिल्हा प्रशासनाला देखील बसला आहे.
(चौकट)
एका अंत्यसंस्काराला खर्च सात हजार
- कोरोना रुग्णाचा मृतदेह ताब्यात घेणारे कर्मचारी, त्यांना लागणारे पीपीई किट, सॅनिटायझर, वाहतूक व इंधन खर्च, जळण आणि अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मानधन असा सर्व खर्च मिळून पालिकेला एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सुमारे सात हजार रुपये खर्च येतो.
- मृत व्यक्ती मुस्लिम समाजातील असेल तर त्याच्या दफनविधीसाठी शवपेटीसह सुमारे १५ हजार ५०० रुपये खर्च येत आहे.
- गेल्या सव्वा वर्षात पालिकेला अंत्यसंस्कारासाठी ७५ लाख ८८ हजार ६०० रुपये खर्च आलेला आहे.
(चौकट)
स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांवर जबाबदारी
- कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी साताऱ्यातील कैलास स्मशानभूमीत १४ अग्निकुंडांची व्यवस्था आहे.
- या ठिकाणी दररोज २५ ते ३५ मृतांवर पालिकेकडून अंत्यसंस्कार केले जातात.
- सातारा पालिकेचे १७ कर्मचाऱ्यांचे पथक या कामी नेमण्यात आले आहे.
- तर गेंडामाळ कब्रस्तान येथे दफनविधीसाठी तीन कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक नेमले आहे.
(पॉईंटर)
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित : १७५७८८
बरे झालेले रुग्ण :
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण :
एकूण मृत्यू : ३८८७
सध्याचा पॉझिटिव्ह रेट : ११%
(कोट)
सातारा पालिकेकडून कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. आरोग्य विभागातील कर्मचारी सव्वा वर्षापासून हे काम जबाबदारीने पार पाडत आहेत. अंत्यसंस्कारावर आतापर्यंत मोठा खर्च झाला असला तरी जिल्हा प्रशासनाची वेळोवेळी मदत मिळत आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारात कोणतीही अडचण येत नाही.
- अभिजित बापट, मुख्याधिकारी
(कोट)
एखाद्या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण करून पालिकेकडे दिला जातो. मृतदेह कसा हाताळावा याचे पुरेपूर प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. सातारा नगरपालिकेकडून अंत्यसंस्काराचे काम अत्यंत काळजीपूर्वक केले जात आहे.
- डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक
डमी : ७८७