सातारा : जिल्ह्यात कोरोना बाधितांचे प्रमाण हळूहळू वाढत चालले असून, मंगळवारी ५९ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे बाधितांचा आकडा ५६ हजार ६०२ वर पोहोचला. तर १२७ बरे झाल्याने आतापर्यंत ५४ हजार ५१ कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्हा प्रशासनाने सोमवारी रात्री जाहीर केल्यानुसार ४१ नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला. यामध्ये सातारा शहराबरोबरच तालुक्यातील तासगाव, शिवथर, खोजेवाडी, शेरेचीवाडी आदी गावांत नवीन रुग्णांची नोंद झाली. तर कऱ्हाड शहरात आणि फलटण तालुक्यातील जिंती व अन्य एका गावांत नवीन रुग्ण स्पष्ट झाले. खटाव तालुक्यातील वडूज, औंध, मांडवे, नांदोशी तर कोरेगाव तालुक्यात सासुर्वे, चिमणगाव, वाठार स्टेशनमध्ये नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर माण, जावळी, आणि महाबळेश्वर तालुक्यातही नवीन काही रुग्णांची नोंद झाली आहे.
दरम्यान, कोरोना मृताची मंगळवारी नोंद झाली नाही. तर कोरोनाने आतापर्यंत १ हजार ८१९ जणांचा बळी गेला आहे.
चौकट :
२९७ संशयितांचे नमुने तपासणीला...
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या १२७ नागरिकांना घरी सोडण्यात आले. तर २९७ संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालयातील ३०, फलटण ७, कोरेगाव २९, वाई २०, खंडाळा १, रायगाव १२, पानमळेवाडी ५८, महाबळेश्वर येथील १५, दहिवडी २७, म्हसवड येथील २, पिंपोडे १३, तरडगाव ३, कृष्णा मेडिकल कॉलेज ८० असे एकूण २८७ जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
........................................................