लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत कोरोनाचा कहर सुरू होता. मात्र, त्यानंतर टप्प्याटप्प्याने बाधित आणि मृतांचे प्रमाण कमी झाले. डिसेंबरच्या तुलनेत जानेवारी महिन्यात बाधित अन् मृतांचे प्रमाण अर्ध्यावर आले. १ हजार ४०२ रुग्णांची नोंद झाली, तर २६ जणांचा बळी गेला. त्याचबरोबर ९७९ जणांनी कोरोनावर मात केली.
जिल्ह्यात गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. सुरुवातीला कोरोना बाधितांचे प्रमाण खूपच कमी होते. कधी १०, २० तर कधी ५० पर्यंत दिवसाला रुग्ण आढळत होते. मात्र, मे महिना सुरू झाल्यापासून कोरोना रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत गेले. जून महिन्याच्या उत्तरार्धापासून कोरोना बाधितांची संख्या दिवसाला शेकडोच्या पटीत वाढत गेली.
जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यात तर कोरोनाने कहर केला. कधी ६००, ७०० तर कधी ८०० च्यावर कोरोना बाधित सापडू लागले. त्यामुळे प्रशासनाचीही चिंता वाढली. सप्टेंबरअखेर बाधितांचा आकडा ३७ हजार पार झाला. तसेच मृत्यमुखी पडणाऱ्यांचीही संख्या वाढली. असे असले तरी ऑक्टोबर महिन्यापासून बाधित आणि मृतांचे प्रमाण कमी होत गेले.
नोव्हेंबर महिना दिलासादायक ठरला. ऑक्टोबरच्या तुलनेत निम्म्याने बाधित आणि मृत कमी झाले. या महिन्यात अवघे ४ हजार ४५० बाधित निष्पन्न झाले, तर ६ हजार ६८९ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे जिल्ह्यातील बाधितांचे प्रमाण घटल्याचे दिसून आले. १६३ जणांचाच कोरोनाने मृत्यू झाला आहे. डिसेंबरमध्ये हे प्रमाण आणखी कमी झाले. बाधित फक्त ३ हजार ५५२ वाढले, तर ३ हजार ३१२ जण मुक्त झाले. ६८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.
जानेवारी महिन्यात तर डिसेंबरच्या तुलनेत प्रमाण अर्ध्यावर आले. नवीन १ हजार ४०२ रुग्णांची नोंद झाली. त्याचबरोबर २६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. असे असले तरी कोरोनामुक्त कमी झाले. ९७९ जण बरे झाले आहेत.
चौकट :
जिल्ह्यात ५४ हजार जणांची कोरोनावर मात
जिल्ह्यात आतापर्यंत ५६ हजार ६०२ कोरोनाचे रुग्ण स्पष्ट झाले आहेत, तर ५४ हजार ५१ जणांनी कोरोनावर मात केली. त्याचबरोबर १ हजार ८४९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या बाधित अन् मृतांचे प्रमाण कमी झाले आहे.
कोट :
जिल्ह्यातील कोरोना बाधित संख्या कमी झाली आहे. ही बाब सुखावह आहे. तरीही गाफील राहून चालणार नाही. यापुढेही लोकांनी शासकीय नियमांचे पालन करावे. तरच कोरोनावर आपल्याला पूर्णपणे मात करणे शक्य होईल.
- डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी
\\\\\\\\\\\\\\\\\\\