लोकमत न्यूज नेटवर्क
कुडाळ : कोरोना महामारीने सगळ्या जगात थैमान घातले. आज वर्ष पूर्ण होऊनही अजून याचा प्रभाव वाढतच आहे. अशातच तोंडावरचा मास्क मात्र साऱ्यांनाच अनिवार्य झाला. वाढत्या कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी मास्क ढालरूपी शस्त्रच बनले. परंतु अजून किती दिवस हा नाका-तोंडावरचा मास्क ठेवायचा, हा प्रश्न आता सामान्यांच्या मनात घालमेल करत आहे.
मार्च २०१९ या महिन्यात सुरू झालेली कोरोना महामारी आज मे २०२१ उजाडले तरीही काही केल्या संपेना. पहिली लाट सावध जात दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. कोरोनाच्या वाढत्या आकड्याने सारेच भयभीत झाले. ज्या गावात याचं नाव नव्हतं, तिथंही कोरोनाचे रुग्ण सापडू लागले. हॉस्पिटल फुल्ल झाली, ऑक्सिजन बेड मिळेनात, अशी अवस्था झाली. अशातच कडक लॉकडाऊन... सारं काही सुन्न! खिन्न मनावस्था सगळीकडे पाहायला मिळत आहे. तोंडावरचा मास्क, सॅनिटायझर, साबणाने हात स्वच्छ करणे, सामाजिक अंतराचे पालन हीच आता जगण्याची बिरुदावली ठरू लागली आहे. माणसाजवळचा माणूस याने हरवून टाकला. नातीगोती सारी जिथल्या तिथं ठप्प झाली. मोबाईलच्या संवादात एकमेकांची विचारपूस दुरूनच होत, मानसिक आधार होऊ लागली.
तोंडावरचा मास्क मात्र आजही तसाच आहे. सव्वा वर्ष झाले तरी जायचं काही नावंच घेत नाही. अजून किती दिवस असंच जीवन जगत राहायचं, हा प्रश्न आता साऱ्यांनाच सतावत आहे. मुसकी बांधल्यासारखी तोंडं करून मोकळा श्वास दाबून ठेवल्यासारखी काहीशी अवस्था आहे. कधी एकदा हे सर्व संपून पूर्वीसारखी परिस्थिती होईल, याची सर्वजण वाट पाहत आहेत. सध्या तरी तोंडावरचा मास्क तसाच ठेवत कोरोनाच्या महामारीशी सामना करत जगणं, हे जिवंत ठेवावे लागणार, हेच खरे आहे.