लोकमत न्यूज नेटवर्क
तरडगाव : कृषी योजना विषयक सर्व आवश्यक माहिती शेतकरी वर्गास देऊन त्या अंतर्गत उत्तम दर्जाची खते बियाणे त्यांना पोहोच करावीत. तसेच कृषी संजीवनी मोहीम संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने राबवावी, अशा सूचना देत शेतकऱ्यांनी देखील त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार दीपक चव्हाण यांनी केले.
फलटण तालुक्यात २१ जून ते १ जुलै दरम्यान शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येत आहे. नुकताच या योजनेचा प्रारंभ रावडी बुद्रूक येथे झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास सत्यजितराजे नाईक-निंबाळकर, भगवानराव होळकर आदी उपस्थित होते.
या योजने अंतर्गत खरीप हंगामात शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहेे. यासाठी साधारण २५ शेतकऱ्यांचा एक गट तयार करावयाचा आहे . गटशेती पद्धतीनुसार त्यांना यामध्ये भाग घेता येणार असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान प्रदीप शिंदे यांच्या शेतात पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. यावेळी खरीप पूर्व तयारी, बांधावर खत वाटप, बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी करणे यासह कृषी योजना विषयक योजनांची माहिती देण्यात आली.
यावेळी प्रकल्प उपसंचालक विनयकुमार राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी भास्कर कोळेकर, तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग, पर्यवेक्षक बापूराव रुपनवर, डी. व्ही. पोरे, कृषी सहायक देवराम मदने, टी. एस. कुंभार, ए. एस. नाळे, डी. व्ही. पोरे, शरद खुडे, दादा अडसूळ, अमित रणवरे, आबा नाळे, जगन्नाथ सूळ, अनिल बोबडे, रामभाऊ कदम, सतीश झारगे, बापूराव करचे, सुहास भोसले आदी मान्यवर व शेतकरी उपस्थित होते.