सातारा : शासनाने सोने खरेदी-विक्री व्यवहारात एक्साईज ड्यूटी हा कर आणण्याचे धोरण राबविण्याच्या तयारीला लागल्याच्या निषेधार्थ येथील सातारा सराफ असोसिएशनने बेमुदत बंद पुकारला आहे. मंगळवारपासून पुकारलेल्या या बंदनुसार शहरातील १५० सराफ व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून शासनाचा निषेध केला. सराफ असोसिएशनने पुकारलेल्या बेमुदत संपानंतर मंगळवारी सकाळी शहरातील सराफी दुकाने तातडीने बंद करण्यात आली. लग्नाच्या मुहूर्ताच्या खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची यामुळे तारांबळ उडाली. सकाळी लवकर सोने खरेदीसाठी शहरात दाखल झालेल्या मंडळींना खरेदी करता आली. मात्र, दुपारी १२ वाजल्यानंतर दुकाने बंद झाल्याने सोन्याची विक्री थांबली. सराफ असोसिएशनच्या मागणीनुसार शासनाने सोने विक्रीवर लावलेल्या एक्साईज ड्यूटी या करामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर भुर्दंड पडणार आहे. लग्नाचे मुहूर्त सुरू आहेत. साहजिकच यामुळे सराफ बाजारपेठेत सोने खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. सोन्यावर १ टक्का ज्यादा एक्साईज ड्यूटी लादण्यात येत आहे. सराफांवरही जाचक अटी लादण्यात आल्या आहेत. एक्साईज विभागाच्या अधिकाऱ्यांना सराफांची झडती घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. सराफांजवळ किती सोने, चांदीचा स्टॉक आहे, हे लिखित स्वरूपात ठेवायचे, हे अधिकारी वारंवार दुकानात येऊन स्टॉकची तपासणी करणार, या प्रकारामुळे सोन्याची विक्री सोडून या अधिकाऱ्यांना सांभाळण्याची वेळ सराफांवर येणार आहे. दरम्यान, मुंबई येथे सराफ असोसिएशन व शासनाच्या प्रतिनिधींसोबत या प्रश्नावर बैठक होणार होती. जर या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला नाही, तर सराफ दुकाने बेमुदत काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)तोळ््याला ३०० रुपये जास्तएक्साईज ड्यूटी या करामुळे सोने खरेदीसाठी गेलेल्या ग्राहकांना प्रतितोळा ३०० रुपये ज्यादा मोजावे लागणार आहेत. लग्न समारंभात सोन्याची ज्यादा प्रमाणात खरेदी केली जाते. त्यामुळे जास्त सोने खरेदीवर जास्त कर भरण्याची वेळ ग्राहकांवर येणार आहे. इन्कम टॅक्स, सेल्स टॅक्स या विभागांव्यतिरिक्त एक्साईज खातेही सराफांच्या मानगुटीवर बसविण्याचे धोरण आम्हाला मान्य नाही. शासनाचे इतर कर आम्ही व्यावसायिक चांगल्या पद्धतीने भरत असतो. आता नवीन कराच्या दुखण्यामुळे ग्राहकांनाही भुर्दंड बसणार आहे. - चंद्रशेखर घोडके, सराफ व्यावसायिक
सराफ दुकानदारांचा कडकडीत बंद
By admin | Updated: March 2, 2016 00:56 IST