सातारा : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानअंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचा २०२३-२४ वर्षाचा निकाल जाहीर झाला असून, जिल्हास्तरावर जावळी तालुक्यातील चोरांबे गावाने प्रथम क्रमांक पटकावलाय. तर कऱ्हाड तालुक्यातील सुपने द्वितीय आणि अंभेरी, ता. खटाव गावाने तृतीय क्रमांक मिळवला आहे. १ मे रोजी या गावांना पालकमंत्र्यांच्या हस्ते गाैरविण्यात येणार आहे.गावांची संपूर्ण स्वच्छता त्याचबरोबर ग्रामीण जनतेत स्वच्छते विषयक वर्तणुकीत बदल घडवून आणण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्ह्यात राबवले जात आहे. या अभियानाअंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत यश मिळविणाऱ्या गावांचा गाैरव करण्यात येतो. स्पर्धेअंतर्गत सातारा जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये चोरांबे गावास ६ लाखांचा पुरस्कार मिळाला आहे. सुपने ग्रामपंचायतीला ४ लाख आणि अंभेरी गावाला ३ लाखांचा पुरस्कार मिळाला आहे.स्वच्छ ग्राम स्पर्धेतील प्रथम तीन ग्रामपंचायती व विशेष पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना १ मे रोजी साताऱ्यातील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते गाैरविण्यात येणार आहे. पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामस्थांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने यांनी केले आहे.
विशेष पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना ५० हजार..या स्पर्धे अंतर्गत ग्रामपंचायतींना विशेष पुरस्कारही देण्यात येतो. यामधील गावांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. कऱ्हाड तालुक्यातील हजारमाचीला घनकचरा, सांडपाणी व मैला गाळ व्यवस्थापनचा दिवंगत वसंतराव नाईक पुरस्कार मिळाला आहे, तर बेलोशी ता. जावळी गावाला पाणी गुणवत्ता आणि व्यवस्थापनचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार तर कोरेगाव तालुक्यातील गोगावलेवाडीला शाैचालय व्यवस्थापनचा दिवंगत आबासाहेब खेडकर पुरस्कार मिळाला आहे.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील स्वच्छतेत सातत्य राखल्यामुळे पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचे विशेष कौतुक आहे. जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीने घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच १ मे पासून सुरु होणारे ‘कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू’ हे अभियानही यशस्वी करावे. - याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी