फलटण (जि. सातारा) : फलटण येथील पांडुरंग कुंभार (वय ४३, रा. मलटण) हे मोटारसायकलवरून जात असताना पेट्रोल पंप जवळ त्यांच्या मानेला चायना मांजा कापला. त्यामध्ये कुंभार गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ फलटण येथील खासगी हॉस्पिटल येथे हलवण्यात आले. सर्जन डॉ. रवींद्र बिचकुले यांनी तत्काळ उपचार करून त्यांच्या मानेला तब्बल १८ टाके टाकले आहेत.मलटण येथे राहणारे कुंभार हे पुणे - पंढरपूर महामार्गावरून मंगळवारी प्रवास करत होते. बाणगंगा नदीवर जवळ असणाऱ्या पेट्रोल पंपाजवळून जाताना मांजा कापला. या अपघातानंतर त्यांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार करण्यात आले. यापूर्वीही मांजामुळे अपघात झाले आहेत.
मांजा विक्रीला बंदी, तरीही विक्री..चायना मांजा विक्री करणे अथवा वापर करणे हा कायद्याने गुन्हा आहे. याबाबतीत जनजागृतीही करण्यात आली. तरी देखील चायना मांजा वापरणे व विक्री करणे, हे थांबलेले नाही. हे या अपघाताने पुन्हा एकदा समोर आले आहे.