शिरवळ : शिरवळ येथील स्टार सिटी याठिकाणी काही कारण नसताना तरुणाला हाताने, लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करत डोके जमिनीवर आपटून गंभीर जखमी करण्यात आले. याप्रकरणी चौघांविरुद्ध शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पंकज प्रकाश पाटील (वय २४, रा. शिंदेवाडी, ता. खंडाळा) हा गंभीर जखमी झाला आहे.
शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिंदेवाडी येथील पंकज पाटील हा घरी असताना शिरवळ येथील भय्या माने याने शिरवळ येथील स्टार सिटी याठिकाणी बोलावून घेतले. पंकज पाटील हा स्टार सिटी याठिकाणी आला असता, त्याठिकाणी एका कार्यालयासमोर वडगाव पोतनीस येथील ओंकार पवार, बंटी, आकाश, नेवसे (पूर्ण नाव माहिती नाही) हे चौघे त्याठिकाणी अचानकपणे आले. काही कारण नसताना त्यांनी हाताने, लाथाबुक्क्यांनी, चपलेने जबर मारहाण करत शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. यावेळी मारहाणीमध्ये पंकज पाटील याचे डोके जमिनीवर आपटल्याने गंभीर दुखापत झाली. पंकज पाटील हा गंभीर जखमी झाला. यावेळी त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या लोकांनी भांडणे सोडवत पंकज पाटील याला शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
याबाबत पंकज पाटील याने दिलेल्या फिर्यादीवरून ओंकार पवार, बंटी, आकाश, नेवसे या चौघांविरुद्ध शिरवळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार धीरजकुमार यादव करत आहेत.