चाफळ : धायटी-माजगाव पाठोपाठ चाफळ गाव कोरोनाचे हॉटस्पाॅट ठरले आहे. चाफळमध्ये एकाच दिवशी दहा जण बाधित आढळून आल्याने गावात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. आरोग्य विभाग व ग्रामस्तरीय कोरोना समितीने उपाययोजना राबवत चाफळ गावात चार दिवसांचा जनता कर्फ्यू लागू केला आहे.
विभागात सुरुवातीला सडावाघापूरमध्ये एन्ट्री केलेल्या कोरोनाने सध्या चाफळ, माजगाव, धायटी, जाधववाडी, वाघजाईवाडी, बाबरवाडी, कडववाडी आदी आठ गावांत थैमान घातले आहे. गुरुवारी चाफळ प्राथमिक आरोग्य केंद्रात चाफळ येथील दहा जणांच्या अँटिजन चाचण्या करण्यात आल्या. दहा जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चाफळकरांची धाकधूक वाढली आहे. यामध्ये वनकर्मचाऱ्यासह व्यावसायिकांचा समावेश असल्याने धास्ती वाढली आहे.
गुरुवारी आरोग्य केंद्रांतर्गत घेण्यात आलेल्या अँटिजन चाचणीत एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात बाधित आढळून आल्याने, माजगाव, धायटीपाठोपाठ आता चाफळही कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. आरोग्य विभाग व ग्रामस्तरीय कोरोना समितीने उपाययोजना राबवत चाफळ गावात चार दिवसांचा जनता कर्फ्यू लागू केला आहे.