कऱ्हाड : जयवंत शुगर कारखान्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्याला लिफ्ट देऊन लूटमार करणाऱ्या टोळीचा कसून तपास केला जात आहे. सातारची स्थानिक गुन्हे शाखा व कऱ्हाडची गुन्हे प्रकटीकरण शाखा स्वतंत्रपणे या प्रकरणाचा तपास करीत असून, तासवडे व किणी टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले आहे. तसेच पोलीस पथके नगर, बीड, लातूर, सोलापूर जिल्ह्यांत पाठविण्यात आली आहेत. धावरवाडी येथील जयवंत शुगर कारखान्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी संभाजी देसाई हे बुधवारी कोल्हापूरला जात असताना कऱ्हाडात एका जीपमधून आलेल्या सहाजणांनी त्यांना लिफ्ट दिली. जीप कऱ्हाडपासून कोल्हापूरच्या दिशेने काही अंतरावर गेली असताना जीपमधील सहाजणांनी काचा बंद करून संभाजी देसाई यांच्याकडील तीन तोळ्यांच्या दागिन्यासह रोकड काढून घेतली. त्यानंतर त्यांना कासेगाव येथे महामार्गावरच निर्जनस्थळी सोडून देऊन चोरटे पसार झाले. गुरुवारी दुपारी याबाबत संभाजी देसाई यांनी कऱ्हाड शहर पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादीनुसार पोलिसांनी तत्काळ तपासाला सुरुवात केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पद्माकर घनवट यांच्यासह पथकाने शुक्रवारी तासवडे व किणी टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याचबरोबर कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे शशिकांत काळे, कुलदीप कोळी, राजेंद्र थोरात यांचे पथक तपासासाठी नगर, बीड, लातूरकडे रवाना झाले आहे. तसेच दुसरे पथक सोलापूर व सांगली जिल्ह्यांत तपासासाठी गेले आहे. (प्रतिनिधी)
अधिकारी लूटप्रकरणी सीसीटीव्ही तपासले
By admin | Updated: March 14, 2015 00:01 IST