गोवारे आणि सैदापूर या दोन गावांना जोडणारा रस्ता हा कृष्णा कालव्याच्या उजव्या भरावावरून गेला आहे. हा भराव मजबूत करून त्यावरून पक्का डांबरी रस्ता तयार केला आहे. या पक्क्या रस्त्याचा वापर गोवारे आणि सैदापुरातील काही भागातील ग्रामस्थ दळणवळणासाठी करतात. यावर्षी पडलेल्या अतिपावसामुळे या कालव्याचा भराव अनेक ठिकाणी खचला आहे. या भरावाला मोठ-मोठी भगदाडे पडली असून, अनेक ठिकाणची माती वाहून गेली आहे. काही ठिकाणी तर डांबरी रस्त्याचा भागही खचला आहे. याच खचलेल्या रस्त्यावरून ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
हा रस्ता नेहमी वर्दळीचा रस्ता असतो. अवजड वाहनांसह रिक्षा आणि दुचाकींची या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. खचलेल्या रस्त्यावर धोक्याची सूचना देणारे फलक अथवा दगड ठेवलेले नाहीत. यामुळे नवीन येणाऱ्या वाहनधारकाला कसरत करावी लागत असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी तर रस्ता एवढा खचला आहे की, वाहने कालव्याच्या काठावरूनच जातात. एखादे वाहन घसरले, तर ते थेट कालव्यात कोसळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
या मार्गाची दुरूस्ती करण्याची तसेच कालव्यानजीक लोखंडी ग्रील बसविण्याची मागणी ग्रामस्थांकडून वारंवार केली जाते. मात्र, या मागणीकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत आहे. मोठी दुर्घटना घडल्यानंतरच संबंधित विभागाला जाग येणार का, असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
- चौकट
मॉर्निंग वॉक करणाऱ्यांनाही धोका
कऱ्हाड-मसूर रस्त्याला मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते. त्या तुलनेत कालव्यानजीकचा रस्ता मॉर्निंग वॉकसाठी सोयीचा आहे. या रस्त्याला जास्त वाहने नसतात. त्यामुळे सैदापुरातील बहुतांशी ग्रामस्थ या रस्त्याला मॉर्निंग वॉकसाठी जातात. मात्र, खचलेल्या रस्त्यामुळे त्यांच्या जिवालाही धोका आहे. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांनाही जिव मुठीत धरूनच या रस्त्यावरून जावे लागते.
- कोट
जलसंपदा विभागाला याबाबत निवेदन दिले आहे. तसेच त्यांच्यासोबत या भरावाची पाहणीसुद्धा केली आहे. त्यांनीही पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ दुरुस्तीबाबत सूचना देऊनही हे काम अद्याप सुरू झालेले नाही. लोकप्रतिनिधींच्या सूचनेकडेही दुर्लक्ष होत आहे. जीवितहानी होण्यापूर्वी हा भराव दुरुस्त करावा, ही अपेक्षा आहे.
- राजाराम जाधव, ग्रामस्थ, सैदापूर
फोटो : ०७केआरडी०५
कॅप्शन : सैदापूर (ता. कऱ्हाड) येथे कालव्यानजीकचा रस्ता खचल्याने ग्रामस्थांचा प्रवास धोकादायक पद्धतीने सुरू आहे.