मायणी : मायणी-निमसोड मार्गावरील मोराळे गावाजवळ असलेल्या येरळा नदीवरील पुलाच्या दुरुस्तीच्या नावाखाली पुन्हा मलमपट्टी सुरू असून, मलमपट्टीऐवजी या पुलाची उंची वाढवून पाणी योग्य पद्धतीने निचरा होण्याची गरज निर्माण आहे.
मायणी-निमसोड मार्गावरील मोराळे गावाच्या हद्दीमध्ये असलेल्या येरळा नदी पात्रातील पुलाची उंची अतिशय कमी आहे. तसेच या पुलावरून नदी पात्राच्या दोन्ही बाजूस जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहालाही योग्य पद्धतीचा निचरा होत नाही. त्यामुळे प्रत्येक वर्षी येरळा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर धरणाच्या सांडव्यावरून पडणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढला की या नदीपात्रातील हा मोराळे पूल किती दिवस पाण्याखाली असतो.
अनेक दिवस पूल पाण्याखाली राहिल्यामुळे व येरळा धरणातून येणाऱ्या पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे प्रत्येक वर्षी या पुलाला धोका निर्माण होतो तसेच या पुलाचा काही भाग खचत असतो किंवा वाहून जात असतो. सप्टेंबर, ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामध्ये या पुलावरून महिनाभर पाणी वाहत होते. या वाहणाऱ्या पाण्यामुळे पुलाचा बराचस भाग वाहून गेला होता. त्यावेळीही संबंधित विभागाकडून या पुलाची डागडुजी व मलमपट्टी करण्यात आली होती.
गतवर्षी जुलै-ऑगस्टमध्ये या परिसरामध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने येरळा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा प्रवाह येरळा नदी पात्रात येऊ लागल्याने या नदीपात्रात असलेला मोराळे पूल पुन्हा एक महिन्याहून अधिक काळ पाण्याखाली होता अधिक काळ पाणी पुलावरून वाहत असल्याने मुलाचा २०१९ मध्ये डागडुजी केलेला भाग वाहून गेला तर नव्याने या पुलाची भिंतही खचते त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला होता.
पुलावरील पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर संबंधित विभागाने या पुलाचे थोडीफार डागडुजी केली. मात्र अनेक दिवस पुलावरून पाणी वाहत असल्याने याचा बराचसा भाग खचल्यासारखा झाला होता या खचलेल्या भागाची दुरुस्ती संबंधित विभागाने पुन्हा सुरू केली आहे. मात्र या पुलाची प्रत्येकवर्षी मलमपट्टी न करता या पुलाची उंची वाढवून गरजेचे आहे तसेच येरळ धरणातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला योग्य वाट देणे गरजेचे आहे. त्यासाठी उत्तर-दक्षिण पाणी पुलाखालून कशा पद्धतीने व योग्य प्रमाणात
जाईल यासाठी पुरेशी व्यवस्था करणे गरजेचे आहे.
(चौकट)
प्रवाशांची मोठी अडचण...
सलग दोन वर्षे येरळा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. त्यामुळे दोन वर्षांत सुमारे तीन महिन्यांहून अधिक काळ हा पूल पाण्याखाली होता. त्यामुळे मायणी-निमसोड, औंध, सातारा मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी अडचण झाली होती. त्यामुळे या पुलाची उंची वाढवणे गरजेचे आहे.
०३ मायणी
मायणी-निमसोड मार्गावरील येरळा नदीवरील पुलाची दोन वर्षांत तिसऱ्यांदा मलमपट्टी सुरू आहे. (छाया: संदीप कुंभार)