शिरवळ : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिरवळ (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले आहे. अपघातामध्ये विष्णू दिनकर तळेकर (वय ४३, रा. तळेकर वस्ती, विंग, ता. खंडाळा) व पांडुरंग गोविंद तुपे (५३, रा. माकोशी, ता. भोर, जि. पुणे) असे ठार झालेल्यांचे नावे आहते. हा अपघात शनिवारी रात्री आठच्या सुमारास झाला. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सांगवी (ता. खंडाळा) येथे नातेवाइकांकडे यात्रेचा कार्यक्रम उरकून दुचाकीवरून (एमएच ११ क्यू ३५३२) विंगकडे निघाले होते. यावेळी दुचाकी शिरवळ हद्दीतील महामार्गावर एका फर्निचर दुकानासमोर आली असता पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की मोटारसायकलस्वार विष्णू तळेकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडले, तर पांडुरंग तुपे हे गंभीर जखमी झाले. दरम्यान, विष्णू तळेकर व पांडुरंग तुपे यांना शिरवळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातानंतर धडक दिलेल्या वाहनधारकाने घटनास्थळावरून पलायन केले आहे. शिरवळ पोलीस दूरक्षेत्रात रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते. (प्रतिनिधी)
दोघे ठार
By admin | Updated: April 12, 2015 00:43 IST