सातारा : शालेय पोषणआहारासाठी आलेल्या धान्याचा अपहार करून गोण्या परस्पर विकल्याप्रकरणी कोरेगावच्या सरस्वती हायस्कूलच्या मुख्याध्यापकासह धान्य विकत घेणाऱ्यालाही तालुका पोलिसांनी अटक केली आहे. हा धान्यसाठा मंगळवारी सातारा तालुक्यातील नागेवाडी येथे पकडण्यात आला होता. मुख्याध्यापक संतोष विश्वनाथ भातखंडे आणि संजय वसंत महामूलकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.नागेवाडी येथील नामदेव अंतू सावंत यांच्या घरात शालेय पोषण आहाराचा साठा असून, तो खुल्या बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आला असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने नागेवाडी येथे जाऊन खात्री केली आणि साठा जप्त केला. या साठ्यात ३९ गोण्या तांदूळ, तीन गोण्या चवळी, दोन गोण्या वाटाणा, सात गोण्या मूगडाळ अशा एकूण ५१ गोण्या आढळून आल्या असून, त्याची किंमत ५१ हजार ७१५ रुपये आहे. या गोण्यांवर ‘सरस्वती’ असे लिहिले असल्याचे आढळून आले. यापूर्वी कोरेगावातीलच एका व्यापाऱ्याच्या साताऱ्यातील गोदामात शालेय पोषण आहार सापडला होता. तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी शमा पवार-ढोक यांनी स्वत: या कारवाईत भाग घेतला होता. त्यानंतर तशीच कारवाई पुन्हा झाली आहे. (प्रतिनिधी)दोघांना शनिवारपर्यंत कोठडी.. ४हा साठा कोरेगावच्या सरस्वती हायस्कूलचे मुख्याध्यापक संतोष विश्वनाथ भातखंडे (वय ५०) यांनी संजय वसंत महामूलकर (वय ४२, रा. महामूलकरवाडी, ता. जावळी) याला विकल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. ४कोरेगाव पंचायत समितीच्या पोषण आहार अधीक्षक अर्चना अतुल जाधव यांनी फिर्याद दाखल केली आहे. भातखंडे आणि महामूलकरला शनिवारपर्यंत (दि. २३) पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
कोरेगावात दोघांना अटक
By admin | Updated: April 20, 2016 23:40 IST