लोकमत न्यूज नेटवर्क
पाचगणी : पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात कृषी विभागाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे येथील लाल मातीत स्ट्रॉबरीच्या दिमतीला आता इंडोनेशियातील निळा भात येतोय. तर त्याची प्रायोगिक स्तरावरील लागवड पश्चिम पट्ट्यातील भाताचे कोठार असणाऱ्या कोयनेच्या खोऱ्यात बिरमणी येथे महाबळेश्वरच्या कृषी विभागाने प्रकाश मोरे शेतकऱ्यांच्या सहयोगाने केली आहे. यामुळे नक्कीच कृषी पर्यटनाच्या माध्यमातून महाबळेश्वरमध्ये पर्यटनास येणाऱ्या पर्यटकांस येत्या काळात आता निळ्या भाताची चव चाखता येणार आहे.
महाबळेश्वरचा पश्चिम विभाग हा अतिपावसाचा असल्याने या विभागामध्ये येथे भाताची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याकरिता कृषी विभागाने या भागाची निवड केली आहे. महाबळेश्वर तालुक्यात प्रथमच असा प्रयोग होत आहे. विशेष करून निळा भात महाबळेश्वर तालुक्यात स्ट्रॉबेरी, केशर, काळा गहू यांबरोबर आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करेल. यापूर्वी केशरच्या आणि काळ्या गव्हाचे प्रयोगही यशस्वी झाले आहेत. पाऊस जास्त असल्यामुळे निळा भात लागवडीचा नावीन्यपूर्ण प्रयोग करण्यात येत आहे. बिरमणी गावातील प्रकाश मोरे यांच्या शेतात या भाताचा वाण घेण्याचे निश्चित झाले आहे. या १३५ ते १४० दिवसांच्या निळ्या भाताच्या पेरणीचा नावीन्यपूर्ण प्रयोग करण्यात आला.
या वेळी कृषी उपसंचालक विजय राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी वाई चंद्रकांत गोरड यांच्या हस्ते जिल्ह्यात प्रथमच महाबळेश्वर तालुक्यामध्ये निळा भात वाणाची पेरणी बिरमणी गावांमध्ये करण्यात आली. या वेळी तालुका कृषी अधिकारी सुनील साळुंखे, कृषी अधिकारी पुरुषोत्तम दळवी, मंडळ कृषी अधिकारी भूपाल बुधावले, कृषी पर्यवेक्षक दीपक बोर्डे, कृषी सहायक रोहन निगडे, रणजित शिंदेसह प्रकाश मोरे, मंगला मोरे, प्रदीप मोरे, वामन मोरे, सुरेंद्र मोरे, गोपीचंद घाडगे, सुभाष मोरे, गणपत मोरे, शरद मोरे आदी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात प्रथमच या प्रकारच्या भाताच्या वाणाचा पेरणीसाठी वापर करण्यात आला आहे. यापूर्वी या भाताचे वाण इंडोनेशियामधून आसामच्या काही शेतकऱ्यांनी उपलब्ध करून या निळ्या भाताची लागवड केली होती.
(पॉइंटर)
-२०१८ मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीन किलो निळ्या भाताचे बियाणे आणले होते. या निळ्या भाताच्या लागवडीमध्ये दोन वर्षांत १४ क्विंटल बियाणे या माध्यमातून उत्पादित करण्यात आले.
-त्यातील या वर्णाच्या बियाण्यांमधील ५० किलो बियाणे महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. निळ्या भाताचा हा नावीन्यपूर्ण प्रयोग सातारा जिल्ह्यात प्रथमच महाबळेश्वर तालुक्यामध्ये केला जात आहे.
(कोट..)
या नावीन्यपूर्ण निळ्या भाताची पेरणी बिरमणीबरोबरच तालुक्यातील वाडा कुंभरोशी, बिरवडी, कासवंड, भोसे, पांगारी, दानवली येथील शेतकरी करणार आहेत.
-दीपक बोर्डे, कृषी पर्यवेक्षक महाबळेश्वर
चौकट :
भातामध्ये पौष्टिक तत्त्व...
निळा भात खाण्यासाठी पौष्टिक आहे. यामध्ये प्रोटीन १२.१३ टक्के कॅल्शिअम ४०. ६८ एमजी आयर्न ३८.८.३८ एमजी, १४.४० एमजी पौष्टिक तत्त्व निळ्या भाताच्या वाणामध्ये आहेत. निळा हा भात खाल्ल्यानंतर शरीरामध्ये होणार आमूलाग्र बदल आयुर्वेदिकदृष्ट्या शरीराची व हाडांची होणारी झीज भात खाल्ल्यानंतर कमी होते, हाडांची होणारी झीज भरून निघते. निळ्या भातामध्ये साखरेचे प्रमाण ०.५ पेक्षा कमी आहे, तर झिंक ९.४६ एमजी याप्रमाणे पौष्टिकतत्त्व निळ्या भातामध्ये आहेत.
०३पाचगणी
बिरमणी, ता. महाबळेश्वर येथे प्रायोगिक तत्त्वावर निळ्या भाताच्या पेरणीप्रसंगी कृषी विभाग व शेतकरी उपस्थित होते.