पाचगणी : पाचगणी मुख्य बाजारपेठेतून दुचाकी अज्ञाताने चोरून नेल्याची घटना घडली असून, याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, मेहुल किशोर पुरोहित हे पाचगणी येथे हॉटेल व्यवसाय करीत असून, ते मुख्य चौकातच वास्तव्यास आहेत. मेहुल पुरोहित यांनी आपल्या मालकीची दुचाकी (एमएच ११ सीएफ ७१७८) ही शनिवारी रात्री साडेदहा वाजता जुन्या पोलीस स्टेशन समोरील निहाल बागवान यांच्या दुकानासमोर लावली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते पुन्हा आणण्यासाठी गेले असता, या ठिकाणी गाडी दिसत नसल्याने त्यांनी आजूबाजूला परिसरात शोध घेतला; परंतु गाडी कुठेही मिळून आली नाही. तसेच घरातील व नातेवाईकांकडे व मित्रमंडळी यांच्याकडेही शोध घेतला; परंतु गाडी मिळून आली नाही. म्हणून पुरोहित यांनी आपली गाडी कुणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेली असल्याचे खात्री झाल्याने, त्यांनी बुधवारी पाचगणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा अधिक तपास पाचगणी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सतीश पवार व त्यांचे सहकारी करीत आहेत.