सातारा : वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या ‘लोकमत’ सातारा आवृत्तीचा १९ वा वर्धापन दिन सोहळा गुरुवारी मोठ्या थाटात साजरा झाला. या स्नेहमेळाव्याला विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावून ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षावही केला. यामुळे वाचकांशी असणारे नाते आणखी दृढ तसेच स्नेहही वृद्धिंगत झाला.साताऱ्यात राजपथावरील पोलिस करमणूक केंद्राच्या अलंकार हाॅलमध्ये ‘लोकमत’च्या वर्धापन दिनानिमित्त स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले हाेते. त्याचे उद्घाटन ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांची प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करून जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रभारी पोलिस अधीक्षक डाॅ. वैशाली कडूकर यांच्या हस्ते झाले.यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सीद, ज्येष्ठ विचारवंत आणि माजी प्राचार्य डाॅ. यशवंत पाटणे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. भरत पाटील, सातारच्या माजी नगराध्यक्षा माधवी कदम, माजी आरोग्य उपसंचालक डाॅ. संजोग कदम, रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील, माजी प्राचार्य डाॅ. राजेंद्र शेजवळ, ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे, सहायक उपाध्यक्ष मकरंद देशमुख, वृत्तसंपादक हणमंत पाटील, मुख्य शाखा व्यवस्थापक संतोष भोगशेट्टी, वरिष्ठ व्यवस्थापक मानव संसाधन व प्रशासन संतोष साखरे, वरिष्ठ व्यवस्थापक जाहिरात व सेल्स श्रीराम जोशी आदी उपस्थित होते.‘लोकमत’ सातारा आवृत्तीचा १९ वा वर्धापन दिन सोहळा थाटात साजरा झाला. मागील अनेक वर्षे ‘लोकमत’ने सातारा जिल्ह्यातील वाचकांशी आपले नाते दृढ तसेच सतत वृद्धिंगत केलेले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक विधायक प्रयत्नांचा सन्मान करत आणि विघातक शक्तींवर कठोर प्रहार करत आपली वाटचाल सुरू ठेवलेली आहे. त्याचबरोबर ‘लोकमत’ने उदात्त हेतू समोर ठेवून आजवर अनेक उपक्रम राबविले आहेत. केवळ बातमी देऊन न थांबता बातमीमागची बातमी शोधण्याचा प्रयत्न करून अचूक विश्लेषण सातारकरांसमोर ठेवले. ही विश्लेषणे, भाकिते आणि ठोकताळे अचूक ठरल्याने ‘लोकमत’वरील वाचकांचे प्रेम आणि विश्वास नेहमीच वृद्धिंगत झाला आहे.‘लोकमत’नं हाक द्यावी अन् सातारकरांनीही या हाकेला ओ देत भरभरून प्रतिसाद द्यावा, हीच आजपर्यंतची परंपरा राहिली आहे. त्यामुळेच वर्धापन दिनानिमित्त अलंकार हॉलमधील स्नेहमेळाव्याला राजकीय, प्रशासकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा तसेच पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी हजेरी लावून ‘लोकमत’वर असलेला विश्वास आणखीन दृढ केला.
विशेषांकालाही सातारकरांचं उत्कट प्रेम..साताऱ्याने जगभरात स्वत:ची अशी ओळख निर्माण केलेली आहे तसेच जिल्हा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिकदृष्ट्या आघाडीवरच आहे. जिल्ह्याला ज्वाजल्य इतिहासही आहे. तसेच जिल्ह्याचे भाैगोलिक स्थानही महत्वपूर्ण आहे. या जिल्ह्यातूनच सह्याद्रीची पर्वत रांग जाते. जागतिक किर्ती असणारे महाळेश्वर हे पर्यटनस्थळ, कास पुष्प पठार आहे. जिल्ह्यात ४० पेक्षा अधिक फळांचे उत्पादन होते म्हणून महाराष्ट्राचं फ्रूट बास्केट असणाराही हा सातारा जिल्हा आहे. अशा सर्व गोष्टी सातारकरांसाठी अभिमानास्पद आहेत. अशाच बाबींवर प्रकाशझोत टाकणारी ‘सातारा प्राईड’ ही पुरवणी वर्धापनदिनाच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आली. ही पुरवणी वाचकांसाठी महत्वाची आहे. तसेच अभ्यासकांसाठीही नक्कीच संग्रही ठेवणारी आहे हे निश्चीतच. त्यामुळे या विशेष पुरवणीलाही सातारकरांचे उत्कट प्रेम लाभले आहे.
‘लोकमत’कडून वाचक चळवळ निर्माण..‘लोकमत’मधून सर्व स्तरांतील वाचकांना माहिती आणि ज्ञान मिळते. ‘लोकमत’ने वाचकांची चळवळ निर्माण केली आहे. सर्वांनाच न्याय देण्यासाठीही ‘लोकमत’ने नेहमीच आग्रहाची भूमिका ठेवली आहे, अशा प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केल्या.