फलटण : फलटण पालिकेने गणेशमूर्तीचे विसर्जनासाठी कसलीच सोयी न केल्याने नीरा-उजवा कालव्यावर घाणीत विसर्जन करावे लागत आहे. यामुळे गणेशभक्तांच्यामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. त्यामुळे ‘बाप्पा फलटण पालिकेला जरा सद्बुद्धी दे’ अशी जणू प्रार्थना करण्याची वेळ भक्तांवर आली आहे.
गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत सर्व भागांत दहा दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. चतुर्थीच्या दिवशी बाप्पांचे भक्त गणपतीची मूर्ती त्यांच्या घरी आणतात. सकाळी, संध्याकाळी त्यांची विशेष पूजा करतात. बाप्पा त्या त्या घरातील परंपरेनुसार दीड, पाच, सात किंवा नऊ दिवस घरात विराजमान असतात. त्यानंतर त्यांचे विसर्जन केले जाते.
शहरात शनिवारी दीड दिवसाच्या तर मंगळवारी पाच दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. पालिकेने यावर्षी गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी कोणत्याही प्रकारची सोयी न केल्याचे दिसत आहे. विसर्जनाच्या ठिकाणी साफसफाई तसेच जंतुनाशकाची फवारणी केलेली नाही. नागरिकांना प्रबोधन करून कॅनॉलमध्ये टाकण्यात येणाऱ्या निर्माल्याचे संकलन केले गेले नाही. विसर्जनासाठी कोणत्याही प्रकारचे पथक नेमण्यात आले नाही. एकंदरीतच गणेशमूर्तीच्या विसर्जनाबाबत उपाययोजना व सुविधा करण्यास नगरपालिका विसरली की काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
दरवर्षी पालिकेकडून श्रीगणेशाच्या स्थापनेपूर्वीच सर्व प्रकारच्या गणेश मूर्तीचे विसर्जन संबंधीचे नियोजन करण्यात येते, परंतु यंदा मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे नियोजन झालेले नाही. मंगळवारी गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी गणेशभक्त क्रांतिसिंह नाना पाटील चौक लगत असणाऱ्या कॅनॉलमध्ये आले होते. तेव्हा या ठिकाणी कोणत्याही प्रकारची स्वच्छता केलेली नव्हती. या ठिकाणी सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते. विसर्जनासाठी कालव्यात उतरण्यासाठी पायऱ्या असणाऱ्या ठिकाणी कचरा व पक्ष्यांची पिसे पडलेली होती अशा अस्वच्छ ठिकाणी विसर्जन करावे लागले.
चौकट
निर्माल्यही पाण्यातच
निर्माल्याचे संकलन करण्याची सुविधा नसल्याने निर्माल्य पाण्यात सोडून दिले.
एकंदरीतच नगर परिषदेच्या ढसाळ कामकाजामुळे नागरिकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे किमान यापुढील दिवस आणि अनंत चतुर्थी यादिवशी तरी विसर्जन व्यवस्था नियोजनबद्ध करावी, अशी मागणी गणेशभक्तांनी केली आहे.
कोट :
फलटण शहरातील घरगुती तसेच गणेशोत्सव मंडळातील मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी फलटण पालिकेने विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. पालिकेच्या वतीने कासार बावडी, पंढरपूर पूल येथे क्रेनची व्यवस्था करणार आहे. स्वच्छता मोहित सुरू केली आहे.
- संजय गायकवाड,
मुख्याधिकारी.
फोटो १६फलटण-गणपती
फलटण पालिकेने गणेशमूर्ती विसर्जनासाठी कसलीच सोय केलेली नाही. त्यामुळे निरा उजवा कालव्यात जाऊन विसर्जन करावे लागले. तेथे कचराही मोठ्या प्रमाणावर साचला आहे.