प्रमोद सुकरे
लोकमत न्यूज नेटवर्ककराड : परवा दिवंगत यशवंतराव चव्हाण जयंतीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार कराड दौऱ्यावर आले होते. त्यांनी दिवंगत यशवंतरावांना अभिवादन केलेच. पण त्याचवेळी माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीबाबत केलेली चौकशी, विमानतळावर आमदार मनोज घोरपडेंना दिलेला कानमंत्र अन डॉ.अतुल भोसलेंना घेऊन कराड ते मुंबई केलेला हेलिकॉप्टर प्रवास सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार कराड दौर्यावर आल्यावर विमानतळावर त्यांच्या स्वागताला चक्क काँग्रेसचे नेते अँड.उदयसिंह पाटील उपस्थित होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.(पण कोयना बँकेला दिलेल्या सदिच्छा भेटिनंतर सगळा विषय समोर आला.)त्यानंतर अजित पवार प्रीतीसंगमावर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी पोहोचले त्यावेळी तर त्यांच्या स्वागताला शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी सरकार मंत्री बाळासाहेब पाटील सरसावले. त्यावेळीही अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावेळी स्मृतीस्थळाकडे जाताना अजित पवारांनी बाळासाहेब पाटलांकडे सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकी संदर्भात आवर्जून चौकशी केली. मानसिंगराव जगदाळेंचा अर्ज कसा काय अवैध ठरला? असा प्रश्न केला. बाळासाहेबांनी सांगितलेली माहिती समजून घेतली. पण त्यानंतर प्रीतीसंगम सोडेपर्यंत बाळासाहेब पाटील अजित दादांसोबतच राहिले.हे सगळ्यांच्या लक्षात राहिले.
प्रीतिसंगावरुन बाहेर पडताना मात्र आमदार डॉ. अतुल भोसले यांना त्यांनी आपण एकत्रित मुंबईला जावू असे सांगत विमानतळावर यायला सांगितले.अन त्यांनी थेट अँड.उदयसिंह पाटील यांची कोयना बँक गाठली.तेथे तासभर खलबते केली अन ते विमानतळावर पोहोचले.
हेलिकॉप्टर मध्ये बसताना त्यांनी आमदार डॉ. अतुल भोसले यांना शेजारी बसवून घेतले. पण त्याचवेळी बाजूला उभ्या असणाऱ्या आमदार मनोज घोरपडेंना बोलावून घेत त्यांना 'कानमंत्र' द्यायलाही ते विसरले नाहीत. त्यामुळे अजित दादांच्या या कार्यशैलीची राजकीय वर्तुळात चर्चा झाली नाही तर नवलच!
प्रवासा दरम्यान दोघांत नेमकी काय चर्चा झाली असेल?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. अतुल भोसले यांना बरोबर घेत कराड ते कोल्हापूर हेलिकॉप्टर आणि कोल्हापूर ते मुंबई विमान असा प्रवास केला. यावेळी त्यांच्याबरोबर आमदार अमोल मिटकरी व अन्य काही लोक होते. पण डॉ. अतुल भोसलेंना शेजारी घेऊन बसलेल्या अजित पवारांनी प्रवासा दरम्यान नेमकी काय चर्चा केली असेल? याबाबत राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहेत.
काय असेल तो कानमंत्र?
विमानतळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार मनोज घोरपडे यांना बोलावून घेऊन काही कान गोष्टी केल्या. त्या बोलण्यात त्यांनी आमदार घोरपडेंना नेमका काय कानमंत्र दिला असेल? याचीही सध्या सह्याद्रीच्या कार्यक्षेत्रात जोरदार चर्चा सुरू आहे बरं.