खटाव : कोविडसारख्या महामारीच्या काळात आता पावसाळी आजारही डोके वर काढत आहेत. सध्या खटावमध्ये वाढत्या डासांचे प्रमाण पाहता मलेरिया तसेच थंडी-तापाचे त्याचबरोबर डेंग्यूसदृश आजारामुळे आधीच कोरोनाची भीती त्यात या तापाच्या येण्याने नागरिकांच्या भीतीचे वातावरण आहे.
यावर्षी पावसाळ्यातील अर्धा सीझन संपला तरी म्हणावा तसा मोठा पाऊस पडला नाही. त्यामुळे गावातील असणाऱ्या सांडपाण्याच्या गटारी तसेच कचरा वाहून गेला नाही. पावसाची भुरभुर जरी असली तरी होणाऱ्या चिखलाच्या साम्राज्यामुळे रोगराईला अधिक चालना मिळत आहे. त्याचबरोबर वातावरणातील होत असलेला बदल दिवसभर ऊन-सावलीचा खेळ सुरू असतो. त्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण दिले जात आहे. विशेषत: या बदलत्या वातावरणाचा लहान मुलांना चांगलाच फटका बसत आहे.
थंडी-तापाचे रुग्ण तसेच मलेरिया व डेंगूसदृश तापाचे निदान लागत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. खासगी रुग्णालय आता रुग्णसंख्येने फुल दिसत आहेत.
खटावमध्ये आरोग्य विभागाच्या वतीने तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने वेळीच डासांचे निर्मूलन करण्यासाठी औषध फवारणी करून योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.