रामापूर : तालुका प्रशासन हे अजून दुसऱ्या लाटेतून सावरत आहे, तोच तिसरी लाट येणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या लाटेत लहान मुलांची काळजी पालकांनी कशी घ्यावी आणि प्रशासन कशी घेणार, याची चिंता पालकांना आणि विद्यार्थ्यांना लागली आहे. तालुक्यातील प्राथमिक शाळेत पहिली ते सातवीमध्ये जवळपास २१ हजार ५८४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तालुक्यातील शासकीय रुग्णालयात एकही बालरोगतज्ज्ञ नाही तर खासगीत केवळ चार बालरोगतज्ज्ञ आहेत. त्यामुळे दुसरी लाट अजून ओसरली नसतानाच तिसरी लाट आली तर तालुका आरोग्य प्रशासन तिचा सामना कसा करणार, ही चिंता सतावत आहे.
याबाबत माहिती अशी की, एक वर्षापेक्षा अधिक कालावधीत शाळा नावाचं गजबजलेलं जग मोबाईल आणि कॉम्प्युटरमध्ये बंदीस्त झालं आहे. मुलांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या दहावी, बारावीच्या परीक्षादेखील रद्द झाल्या. या मुलांच्या भवितव्याबाबत पालक संभ्रमात आहेत. येत्या काही महिन्यात येणाऱ्या तिसऱ्या लाटेत अठरा वर्षांखालील मुलांना अधिक धोका असल्याचा इशारा आरोग्य विभागातील काही तज्ज्ञांनी दिला आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी आपल्याकडे तशी यंत्रणा आहे का? असेल तर तिचे नियोजन कसे करणार, याची चिंता तालुक्यातील पालकांना लागली आहे.
तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी तालुक्यातील तीस बेडचे लहान मुलांसाठीचे कोरोना सेंटर तयार ठेवा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, त्या सेंटरमध्ये बालरोगतज्ज्ञ कोठून आणणार, हा प्रश्न प्रशासनाला पडणार आहे. तालुक्यातील शासकीय सेवेत एकही बालरोगतज्ज्ञ नाही तर संपूर्ण तालुक्यात केवळ चार बालरोगतज्ज्ञ आहेत. यामुळे तालुक्यातील आरोग्य विभाग तिसऱ्या लाटेचा मुकाबला कसा करणार? यामुळे अठरा वर्षांखालील मुलाचे काय होणार? ही चिंता पालकांना भेडसावत आहे.
तिसरी लाट येण्यापूर्वी अठरा वर्षांखालील मुलांच्या लसीकरणाबाबत कोणीच काही बोलत नाही. त्यांना वेळेत लसीकरण झाले तर तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी होण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया पालकांमधून व्यक्त होत आहे.
पहिली ते सातवी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी संख्या
वर्ग मुले मुली एकूण
पहिली १४१६ १४२६ २८४२
दुसरी १४६८ १३६३ २८३१
तिसरी १५७६ १५१६ ३०९२
चौथी १६३६ १५९५ ३१३१
पाचवी १७०५ १५३२ ३१३७
सहावी १५९९ १५८८ ३१८७
सातवी १५९६ १५६८ ३१६४
एकूण १०,९९६ १०,५५८ २१,५८४
तालुक्यातील बालरोगतज्ज्ञ
शासकीय रुग्णालय - 00
खासगी रुग्णालय - ०४