हणमंत यादव
चाफळ : ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या आशा सेविकांना शासनाने दोन महिन्यांपासून मासिक मानधन दिले नाही. वाढीव मानधनही अनेक महिन्यांपासून दिले जात नसल्याने आशा सेविकांचे ‘काम चालू, मानधन बंद’ अशी अवस्था होऊन बसली आहे. शासनाने थकित मासिक मानधनासह वाढीव मानधन आठ दिवसांत न दिल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा संतप्त आशा सेविकांनी दिला आहे.
पाटण तालुक्यात तेरा प्राथमिक आरोग्य केंद्र, ६४ उपकेंद्रांत ३३५ आशा सेविका व १७ गटप्रवर्तक कार्यरत आहेत. आशा सेविकांनी विविध मागण्यांसाठी जून महिन्यात पुकारलेल्या राज्यव्यापी संपादरम्यान शासनाने काही मागण्या मान्य केल्या होत्या. त्यानुसार जुलै महिन्यापासून वाढीव मानधन दीड हजार रुपये इतर काही मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र दोन महिने होत आले, तरी वाढीव मानधन मिळाले नाही. चार महिन्यांपासून प्रतिमहिना दोन हजार रुपयांचे मानधनही बंद केले. यामुळे तुटपुंज्या मानधनावर आरोग्य यंत्रणेचा खंबीरपणे डोलारा पेलणारा कणाच आता मानधनाअभावी पुरता खचून गेला आहे. महागाईने वस्तूंचे दर गगनाला भिडले असताना, घरखर्चासह इतर खर्चाचा मेळ घालायचा कसा, हा प्रश्न आशा सेविकांसमोर उभा ठाकला आहे.
मायबाप सरकारने कोरोना काळातील आमच्या कामाची प्रशंसा करून मानधन वाढीने हातभार लावण्याची घोषणा केली होती. मात्र दोन महिने होऊनही वरिष्ठांचा आदेश व निधीचा भार काही पाटण तालुक्यापर्यंत न आल्याने तालुका कार्यालयाचाही हात पोहोचेना, अशी बिकट परिस्थिती ओढावलेली आहे. आशा स्वयंसेविकांना ७५ प्रकारची विविध कामे करावी लागत आहेत. ती आजही सुरूच आहेत. ‘हातचे काम सुरू अन् मानधन बंद’ अशी केविलवाणी अवस्था आशांची झाल्याने सणासुदीच्या दिवसांत आशांच्या पदरी पुन्हा निराशा पडली आहे. त्यामुळे महागाईमुळे खर्चाचा ताळमेळ घालताना आशांची दुर्दशा होणार हे काही दिवसांतच समजणार आहे.
चौकट
कोरोना नियंत्रणात मोठे योगदान
आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त असल्याने कोरोना काळात मोठी जबाबदारी यांच्यावर पडली होती. डॉक्टर्स, पोलीस, शासकीय यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. जीव मुठीत घेऊन आवश्यक साधने व प्रशिक्षण नसतानाही कोरोना नियंत्रणात त्यांचा खारीचा वाटा आहे. याचा खऱ्याअर्थाने प्रशासनाला विसर पडला आहे. शासनाने थकित मासिक मानधनासह वाढीव मानधन येत्या आठ दिवसांत दिले नाही, तर कामबंद आंदोलनाचा इशारा पाटण तालुक्यातील संतप्त आशा सेविकांनी दिला आहे.