लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा: जिल्ह्यात गुरुवारी म्युकरमायकोसिसमुळे
आणखी एकाचा मृत्यू झाला. यामुळे बळींची संख्या ११ वर पोहोचली आहे.
दरम्यान, म्युकरमायकोसिस हा आजार नियंत्रणात आणण्यासाठी ॲम्प्युटरेशन बी या इंजेक्शनची गरज आहे. पण त्याचाच मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे.
जिल्ह्यात म्युकरमायकोसिचे ८३ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी सध्या सिव्हिल हॉस्पिटल येथे २४ रुग्ण उपचार घेत आहेत. तर उर्वरित इतर खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. म्युकरमायकोसिस हा आजार नियंत्रणात आणण्यासाठी एका रुग्णास सकाळी २, दुपारी २, सायंकाळी २ अशी सहा इंजेक्शन गरजेची आहेत. अन सिव्हिल हॉस्पिटल व इतर ठिकाणची अशी एकूण ८३ रुग्णसंख्या विचारात घेतली तर त्यासाठी ४०० ते ४२५ ॲम्प्युटरेशन बी या इंजेक्शनची आवश्यकता आहे. पण सध्यस्थितीत १५० ते २०० च इंजेक्शन येत आहेत. त्यामुळे या रुग्णांवर उपचार करणे उघड जात आहे.
म्युकरमायकोसिस हा आजार नियंत्रणात आणण्यासाठी सिव्हिल हॉसिपटल येथे स्वतंत्ररीत्या वैद्यकीय यंत्रणा आहे. या हॉस्पिटलमध्ये २ स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले असून, १७ बेड कार्यान्वित करण्यात आले आहेत. मात्र, आता वाढत्या संख्येने तेही अपुरे पडत आहेत. याबाबत प्रस्तावित बेड तसेच ॲम्प्युटरेशन बी या इंजेक्शनसाठी आरोग्य उपसंचालक यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे.