रहिमतपूर : ‘नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर महिनाभर विरोधकांकडून जयकुमारवर गुन्हा दाखल करून आत टाकायला येतंय का? याचा प्रयत्न केला जात होता; परंतु नियतीने मला साथ दिली. काही दिवसांपूर्वी ‘सुरुवात तुम्ही केली; शेवट मी करणार’ अशी क्लिप वायरल होत होती. परंतु ‘सुरुवात तुम्ही केली आणि नियतीनेच तुमचा शेवट केलाय’ अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव न घेता टीकास्त्र सोडले.कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली येथील जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती भीमराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने पूर्णत्वास आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र व श्री अंबिका विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार नितीन पाटील, आमदार मनोज घोरपडे, भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, माजी कृषी सभापती भीमराव पाटील, चित्रलेखा माने-कदम, रामकृष्ण वेताळ, संपत माने, वासुदेव माने आदी मान्यवर उपस्थित होते.जयकुमार गोरे म्हणाले, ‘प्राथमिक आरोग्य केंद्र व सोसायटीच्या माध्यमातून भीमराव पाटील यांच्या काही स्वप्नांची स्वप्नपूर्ती झाली आहे, ते माझे राजकीय गुरू आहेत. वाठारच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. वाजंत्री यांचं काम फक्त नवरदेवाला स्टेजवर सोडायचे असते; परंतु अनेक वाजंत्रींनी स्टेजवर चढायचा प्रयत्न केला. परंतु काकांनी त्यांना स्टेजवर चढू दिले नाही. आरोग्य केंद्र उभारण्यासाठी भीमराव पाटील यांनी प्रचंड प्रयत्न केले व ते काम व्हावे, यासाठी मीही प्रयत्न केला. भूमिपूजनावेळी त्यांनी सांगितलं ते भूमिपूजन करतायेत, मी सांगितलं उद्घाटनाला ते दिसणारच नाहीत, काळजी करू नका. आज विरोध करायला विरोधकच दिसत नाहीत.’यावेळी खा. नितीन पाटील, आ. मनोज घोरपडे, धैर्यशील कदम यांनी मनोगत व्यक्त केले. भीमराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. दीपक साबळे यांनी सूत्रसंचालन केले. सुनील कांबळे यांनी आभार मानले.
आता यमानंच फर्मान काढलंय..व्हायरल क्लिपचा दाखला देत जयकुमार गोरे म्हणाले, ‘विधानसभेला अजित पवार यांनी जे तिकीट जाहीर केलं ते नाकारून ज्यांनी विरोधात काम केलं मग त्यांचं काय झालं, ते महाराष्ट्राने पाहिलं. ज्यांनी मला राजकारणातून संपवण्याचा गेली वीस वर्षे सातत्याने प्रयत्न केला. आता यमानंच फर्मान काढलंय, जोपर्यंत याचं केलेलं पाप फिटत नाही, तोपर्यंत स्मशानभूमीत न्यायचं नाही,’ अशा शब्दांत विरोधकांचे वाभाडे काढले.