फलटण : ‘फलटण तालुक्यातील शेतकरी वर्गासाठी विविध योजना राबवणाऱ्या फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने लवकरच ‘अॅनिमल अॅम्ब्युलन्स’ म्हणजेच जनावरांसाठी रुग्णवाहिका सुरू करण्यात येणार आहे,’ अशी माहिती बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
रघुनाथराजे यांनी सांगितले की, फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांकडील जनावरे म्हणजेच गाय, म्हैस, बैल, घोडा अशा प्राण्यांना उपचारासाठी ने-आण करण्यासाठी या रुग्णवाहिकेचा उपयोग केला जाईल. तसेच फलटण संस्थानचे अधिपती दिवंगत श्रीमंत मालोजीराजे नाईक-निंबाळकर यांनी स्थापन केलेल्या फलटण बाजार समितीचे पहिले सभापती अॅड. विश्वंभर झिरपे यांच्या नावे आगामी काळात ‘अॅड. विश्वंभर झिरपे पशुवैद्यकीय रुग्णालय’देखील बाजार समितीच्या आवारात सुरू होणार आहे. यानिमित्ताने तालुक्यातील शेतकऱ्यांची सेवा करण्याचे व्रत जोपासले जात असून, याचे मोठे समाधान आहे.