सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक पाऊस होत असून महाबळेश्वरला अवघ्या ७ मिलीमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले. सध्या फक्त पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सकाळच्या सुमारास धरणात १०३.०८ टीएमसी पाणीसाठा होता.
जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून पाऊस सुरू होता. पूर्व तसेच पश्चिम भागातही चांगला पाऊस झाला. पूर्वेकडील दुष्काळी भागात पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांना फायदा झाला. पावसामुळे बाजरी, मूग, मटकी, मका अशी पिके चांगली आली आहेत. तसेच अनेक ओढ्यांना पाणी वाहू लागले आहे. बंधाऱ्यांतही चांगला पाणीसाठा होऊ लागलाय.
पश्चिमेकडील कोयना, नवजा, महाबळेश्वर, कास, बामणोली आणि तापोळा भागात सतत पाऊस होता. यामुळे कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी, बलकवडी अशा प्रमुख धरणांत पाणीसाठा वेगाने वाढू लागला आहे. त्यातच महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणात पाण्याची आवक वाढत गेली. त्यामुळे १०५.२५ टीएमसी साठवण क्षमता असणारे कोयना धरण काठोकाठ भरले. त्यामुळे आवक पाहता पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून रविवारपासून विसर्ग सुरू करण्यात आला.
रविवारी कोयना धरणातील साठा १०४ टीएमसीच्या वर गेल्यानंतर सहा दरवाजे एक फुटाने उचलून नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला. तसेच पायथा वीजगृहातून पाणी सोडण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवला. सवा पाच फुटांपर्यंत वर दरवाजे घेण्यात आले होते. यामुळे धरणातून पायथा वीजगृह व दरवाजातून मिळून ५० क्युसेक पाणी विसर्ग सुरू होता. यामुळे कोयना नदीपातळीत वाढ झालेली. मात्र, दोन दिवसांपासून पाऊस कमी झाला. त्यामुळे धरणात पाण्याची आवक कमी होत आहे.
गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास कोयना धरणात २१०० क्युसेक पाण्याची आवक होत होती. तर धरण साठा १०३.०८ टीएमसी होता. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने धरणाचे सर्व सहा दरवाजे बंद करून विसर्ग थांबविला. सध्या फक्त पायथा वीजगृहातूनच २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
चौकट :
नवजा येथे अवघा ३ मिलीमीटर पाऊस
जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस कमी झाला आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला ५ मिलीमीटर पाऊस पडला. तर जूनपासून आतापर्यंत ४१९३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर नवजाला ३ आणि यावर्षी आतापर्यंत ५४९५ तर महाबळेश्वरला ७ आणि जूनपासून ५५६५ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे.
........................................................