शहरात महत्त्वाकांक्षी सांडपाणी प्रक्रिया योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. सांडपाण्याचा प्रश्न या योजनेमुळे कायमचा निकाली निघणार आहे. मात्र अजूनही आगाशिवनगर येथील काही भागात साधी गटरचीही सोय नसल्याने त्या परिसरातील सांडपाण्याचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. तर कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्याच्या उत्तरेकडील कॉलन्यांमध्ये शेवटी अनेक ठिकाणी डबकी तयार होऊन शेतकऱ्यांच्या शेतात ते पाणी जात आहे. आगाशिवनगर येथील व्यंकटेश कॉलनी परिसरातील रहिवाशांच्या सांडपाण्याचा प्रश्न सध्या गंभीर बनला आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात पहिल्या पाचमध्ये येण्याचा संकल्प पालिकेने केला आहे. मात्र, या संकल्पात आडकाठी येईल, अशा गैरसोयी सध्या वाढत आहेत.
सध्या हे सांडपाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे परिसरातील शंभरावर कुटुंबांना डासांचा, डुकरांचा त्रास होऊ लागला आहे. या प्रश्नामुळे साथीच्या आजारांची भीतीही व्यक्त केली जात आहे.
- चौकट
रस्त्यासह विजेची सोयही नाही
झोपडपट्टीसारख्या ठिकाणी रस्त्यांची विजेची सोय आहे. मात्र, व्यंकटेश कॉलनीमध्ये विजेची, रस्त्याची सोय नाही. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी पालिकेकडे पाठपुरावा केला आहे. मात्र ठोस निर्णय न झाल्याने हा प्रश्न रखडला आहे. सांडपाणी वाहण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.
फोटो : ०२केआरडी०५
कॅप्शन : मलकापूर-आगाशिवनगर येथील व्यंकटेश कॉलनीमध्ये सांडपाणी रस्त्यावरूनच वाहत आहे. (छाया : माणीक डोंगरे)