सातारा : हिंदुत्व आणि मराठी अस्मिता ही जशी शिवसेनेची ओळख आहे, तशी संकटाच्या वेळी मदतीला धावून जाणारी कडवट शिवसैनिकांची संघटना हीदेखील शिवसेनेची ओळख आहे. याचीच प्रचिती शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने कातरखटाव (जि. सातारा) येथे सर्वांना आली. शिवसेनेचे हे नाते निभावणारे हळवे रूप पाहून उपस्थितांचे डोळेही पाणावले.
शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन शनिवारी महाराष्ट्रभर विविध लोकोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सातारा जिल्ह्यातही यानिमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पण या कार्यक्रमांना खटाव तालुक्यातील एका कार्यक्रमामुळे शिवसेनेच्या शिवसैनिकाप्रती असलेल्या बांधिलकीचे वेगळे कोंदण लाभले. शिवसेना हे एक कुटुंब आहे आणि प्रत्येक शिवसैनिक हा त्या कुटुंबाचाच एक भाग आहे. त्यांच्या लढावू बाण्यावर व त्यागावर शिवसेना उभी आहे. त्यामुळे एखाद्या शिवसैनिकाला काटा टोचला तरी बाकीच्यांनी धावून गेले पाहिजे, ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण होती. ती शिकवण शिवसैनिक किती प्राणपणाने कृतीत आणतात याची प्रचिती या घटनेने आणून दिली.
त्याचे असे झाले, की शिवसेनेचे कातरखटाव येथील शिवसेना शाखाप्रमुख दीपक मोहन दळवी (वय ३०) यांचे अलीकडेच कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, तीन वर्षे, दीड वर्षे व सहा महिने वयाची कोवळी मुले आहेत. दळवी यांच्या अकाली जाण्याने या कुटुंबाचा आधारच कोसळला. आपल्या एका बांधवाच्या कुटुंबावर ओढवलेल्या या संकटाच्या वेळी आपण सर्वांनी त्यांना मदत केली पाहिजे, त्यांना आधार दिला पाहिजे, या भावनेतून शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख युवराज पाटील, वडूज शहरप्रमुख किशोर गोडसे, कातरखटाव विभागप्रमुख संतोष दुबळे यांच्यासह अन्य शिवसैनिकांनी शनिवारी दळवी कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंची मदत घरी जाऊन दिली. शिवाय या कुटुंबाच्या व कोवळ्या जिवांच्या भवितव्याच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे वचन चंद्रकांत जाधव यांनी याप्रसंगी दिले.
या वेळी हणमंत घाडगे, पळसगाव शाखाप्रमुख हणमंत देवकर, अजय देवकर यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
फोटो ओळ : कातरखटाव येथे दिवंगत शिवसेना शाखाप्रमुख दीपक दळवी यांच्या कुटुंबीयांना शिवसेनेच्या वतीने मदत करण्यात आली.