प्रशासन लढतय;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:38 AM2021-04-18T04:38:02+5:302021-04-18T04:38:02+5:30

कोरोनाने कसं जगावं हे शिकवलं; पण काहींना अजून कसं वागावं ते समजलेलं नाही. प्रशासन सांगतय घरात राहा, तर हे ...

Administration fighting; | प्रशासन लढतय;

प्रशासन लढतय;

googlenewsNext

कोरोनाने कसं जगावं हे शिकवलं; पण काहींना अजून कसं वागावं ते समजलेलं नाही. प्रशासन सांगतय घरात राहा, तर हे रस्त्यावर फिरताहेत. प्रशासन सांगतय मास्क घाला, तर हे दात काढताहेत. एवढच नव्हे तर संचारबंदीत चौकात उभं राहून प्रशासनावर तोंडसुख घेण्याचा दळभद्रीपणाही काहीजण करताहेत. कडक लॉकडाऊन लावायला पाहिजे, असं काहींचं म्हणणं; पण संचारबंदी आपण किती पाळली, याचा विचार कोण करणार? नाठाळाच्या माथी हाणावी काठी, असं संतवचन आहे; पण या अतिशहाण्यांच्या पाठीवरच पोलिसांची लाठी आता बसायला हवी.

संक्रमण भयावह पद्धतीने पसरलंय. रूग्णालयात जागा नाही. घराघरात रूग्ण तडफडताहेत. किड्या-मुंगीसारखी माणसं मरताहेत. सावरायला कोणी नाही, रडणाराही कुणी नाही.

मी-मी म्हणणारे स्मशानभूमीत वेटिंगवर आहेत आणि अशा परिस्थितीतही आपण शहाणं होऊ नये, हा करंटेपणाच नाही का? हात दाखवून अवलक्षण म्हणतात. आपलही सध्या तेच चाललय. पुढच्याला ठेच लागली की मागच्याने शहाणं व्हावं; पण पुढचा जिवानिशी गेला तरी आपण वेड पांघरून घेतलंय त्याचं काय? शहाणपण देगा देवा, असं आपणच म्हणतो; पण प्रशासन देत असलेलं शहाणपण आपल्या पचनी पडतय का, आपण शहाण्यासारख वागतोय का, याचाही विचार प्रत्येकाने करायला हवा.

वास्तविक, कोरोनाला अद्यापही अनेकांनी हलक्यात घेतलय. खांदे उडवून काय होतय, म्हणणारेही उदंड झालेत. एवढच काय तर कोरोनावाढीचं खापर प्रशासनाच्या माथी मारण्यातही काहीजण धन्यता मानताहेत; पण प्रशासनाला दूषणं देताना आपण जबाबदारीने वागतोय का, प्रशासनाने घातलेले निर्बंध पाळतोय का, याचाही अंतर्मुख होऊन विचार करणे गरजेचे आहे. डोंगर दुरून साजरे दिसतात. स्वर्ग मेल्यानंतर दिसतो. तसंच कोरोना घरापर्यंत आल्याशिवाय त्याचं गांभीर्य आपल्याला समजणार नाही; पण जेव्हा तो येईल तेव्हा पश्चातापाशिवाय हाती काही राहणार नाही, हे नक्कीच.

शेवटी एवढच...

घरी राहा, सुरक्षित राहा. तुमचं कुटुंब ही तुमचीच जबाबदारी.

- संजय पाटील, कऱ्हाड

Web Title: Administration fighting;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.