वाई : ‘प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करूनही आणखी बाधित रुग्ण सापडत आहेत. रुग्णांच्या घरातील लोकांसोबत हाय रिस्क व लो रिस्क इतर लोकांची तपासणी होते का? या गोष्टीची शहानिशा केली असता, हाय रिस्क लोकांची तपासणी होतच नसल्याने दुसऱ्या टप्प्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे यापुढे गृह अलगीकरणात बाधित रुग्ण आढळल्यास कारवाई करण्यात येईल,’ असा इशारा प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर यांनी दिला.
वाई पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर उपस्थित होते.
चौगुले-राजापूरकर म्हणाल्या, ‘दुसऱ्या टप्प्यातील रुग्णसंख्या कमी होत असली तरी तिसऱ्या टप्प्यात ती वाढण्याची शक्यता आहे. सध्या सर्व कामांमध्ये शिथिलता येऊ लागल्याने तिसऱ्या टप्प्यामध्ये त्याची वाढ नक्कीच दिसून येऊ शकते. हे थांबविण्यासाठी नेमून दिलेल्या पथकाला प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी पन्नास घरांचा एक रूट तयार करून त्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी शिक्षकांची नेमणूक करावी.’
‘ग्रामीण भागात गावांमध्ये कन्टेनमेंट झोन करणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने योग्य नाही. शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी सतत बाहेर पडावे लागते. त्यामुळे हे योग्य नाही. याचवेळी नेमून दिलेल्या पथकातील जबाबदार अधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर रुग्णांचे सर्वेक्षण होते की नाही, हे पाहणे आवश्यक आहे. ज्या घरामध्ये कोरोना रोगाची लक्षणे आहेत, त्यांची तातडीने तपासणी करावी. नगर परिषदेने कोरोना चाचणीचे जबाबदारीपूर्वक नियोजन करावे,’ असेही चौगुले-राजापूरकर यांनी सुचविले.
पूर्वीची गृह अलगीकरण पद्धत शासनाने बंद केली आहे. कोरोनाबाधित निघालेला रुग्ण हा गावोगावच्या विलगीकरण कक्षात सक्तीने दाखल झालाच पाहिजे. पूर्वी चाचणी केल्यानंतर रुग्णाला बाहेर सोडले जायचे पण त्याची चाचणी निगेटिव्ह येईपर्यंत त्याने बाहेर फिरता कामा नये, याची काळजी कुठलीही यंत्रणा काळजी घेताना दिसत नाही. सध्या गावोगावी ग्रामपंचायतीने विलगीकरण कक्षांची उभारणी केली आहे. रुग्णांना त्या कक्षात दाखल करतेवेळी राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. हे कृत्य चुकीचे आहे. ज्याठिकाणी विलगीकरण कक्ष सुरु केले आहेत, त्याठिकाणी पाणी, वीज, भोजन, व्यवस्था तसेच स्वच्छता आहे की नाही, याची काळजी घेतली पाहिजे. याठिकाणी नेमलेल्या डॉक्टरांनी त्या-त्या विलगीकरण कक्षातील रुग्णांची काळजी घेणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील कोरोनाबाधित निघालेले रुग्ण व त्यांच्या संपर्कात आलेले आणि घरातील नातेवाईक गावासह इतरत्र फिरत आहेत, अशा तक्रारींमध्ये वाढ झाली आहे.
चौकट
सुरक्षा पाळल्यास धोका टाळणे शक्य
स्थानिक ग्राम दक्षता समित्यांनी यात लक्ष घालावे. त्यांना त्यासाठी सक्षम करणे आवश्यक असून, ही यंत्रणा सक्षम होत नाही तोपर्यंत मोठ्या अडचणी निर्माण होणार आहेत. ग्रामपंचायतीमध्ये विलगीकरण कक्ष झाले आहेत पण तेथील यंत्रणा यशस्वी काम करते की नाही, हे पाहणेही गरजेचे आहे. याठिकाणी भेटायला येणारे नातेवाईक किंवा जेवण देण्यासाठी येणारे रुग्णांच्या संपर्कात येणार नाहीत, याची काळजी घेणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त सुरक्षितता पाळल्यास आपण तिसऱ्या लाटेचा धोका टाळू शकतो, असे प्रांताधिकाऱ्यांनी सांगितले.
०४वाई-प्रांत
वाई पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर यांनी सूचना केल्या. यावेळी तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर उपस्थित होते. (छाया : पांडुरंग भिलारे)