वाई
शहरात पोपट बंदिस्त करून ठेवल्याप्रकरणी वन विभागाने कारवाई करून पोपट पिंजऱ्यासह जप्त केला आहे. दि ८ रोजी वन विभागास मिळालेल्या माहितीवरून वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांनी गणपती आळी वाई परिसरात जाऊन पाहणी केली असता, वन्यपक्षी पोपट पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करून ठेवला असल्याचे दिसून आले. याप्रकारणी पंचनामा करून पोपट पिंजऱ्यासह जप्त करून ताब्यात घेण्यात आला आहे.
वन्यपक्षी
पोपट यास वन्यजीव (संरक्षण) कायद्यानुसार संरक्षण देण्यात आलेले आहे. जप्त करण्यात आलेल्या वन्यपक्षी पोपटाची वाईच्या पशुधन विकास अधिकारी सबा नालबंद यांच्याकडून तपासणी करून घेतली आहे. यावेळी वाईच्या वनपरिक्षेत्र अधिकारी स्नेहल मगर यांनी वन्यपक्षी व वन्यप्राणी यांचा माग काढणे, पकडणे, पाळणे, बंदिस्त करून ठेवणे, शिकार करणे हे वन्यजीव (संरक्षण) कायद्याने गुन्हा असून असे कृत्य करणाऱ्यांवर वन विभागाकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. सदरची कारवाई उपवनसंरक्षक सातारा महादेव मोहिते, सहायक वनसंरक्षक सुधीर सोनावले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी स्नेहल मगर, वनपरिक्षेत्र कार्यालय लिपिका लक्ष्मी सातपुते, वनपाल सुरेश पटकारे, वनरक्षक वैभव शिंदे, संदीप पवार यांनी केली.