शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील हॉटेलजवळ जुन्या औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीची बस अडवित चालकांकडून बसची चावी काढून घेत सिगारेट पिण्यासाठी पैसे मागत बस चालकांकडून खिशातील ३०० रुपये जबरदस्तीने काढून घेत बाजारपेठ याठिकाणी एका गाडीची काच फोडून नुकसान करून दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या अवघ्या दोन तासांमध्ये शिरवळ पोलिसांनी आवळल्या आहे. यामध्ये दोघांना अटक करण्यात आली असून एकजण फरार झाला आहे.
याबाबतची शिरवळ पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शिरवळ (ता. खंडाळा) गावच्या हद्दीमध्ये दुचाकीवरून येत एका हॉटेलजवळ बस (एमएच १२ एफझेड ८२९०) ही अडवून बसचालक महेश ज्ञानोबा खुंटे यांना सिगारेट पिण्याकरिता दुचाकीवरून आलेले शिरवळ येथील अतिष ऊर्फ बाबू राजेंद्र कांबळे (वय १९), सिद्धांत दत्तात्रय खडसरे(२१) व अनोळखी व्यक्ती यांनी पैसे मागत बसचालक महेश खुंटे यांनी पैसे देण्यास नकार देताच संबंधितांनी बसची चावी काढून घेऊन खिशामधील ३०० रुपये जबरदस्तीने काढून घटनास्थळावरून पलायन केले तर थोड्यावेळाने शिरवळमधील सचिन दत्तात्रय गुंजवटे यांची (एमएच-१२-एचआय-३५९०) या गाडीची समोरील काच फोडून नुकसान केले आहे.
याबाबतची फिर्याद महेश खुंटे यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिल्यानंतर शिरवळ पोलिसांनी धडक शोधमोहीम राबवित दहशत माजवित बाजारपेठ याठिकाणी लपून बसलेल्या अतिश उर्फ बाबू कांबळे, सिद्धांत खडसरे यांना थरारक जेरबंद केले तर एक युवक हा पोलिसांचा सुगावा लागल्याने फरार झाला आहे.
दरम्यान, संबधितांना खंडाळा येथील न्यायालयासमोर पोलीस कोठडी संपल्यानंतर उभे केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई करीत आहे.