कऱ्हाड : साखरपुडा झाल्यानंतर बारा तोळे सोन्याची मागणी करीत लग्नास नकार देणाऱ्या वाग्दत्त वरासह चौघांवर कऱ्हाड तालुका पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत वाग्दत्त वधूच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. वाग्दत्त वर सुनील गजानन कदम, त्याचे वडील गजानन परशुराम कदम, भाऊ संदीप गजानन कदम आणि चुलता किसन परशुराम कदम (सर्व रा. तारापूर, मुंबई) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तारापूर येथील सुनीलचा विवाह उंडाळे परिसरातील एका युवतीशी ठरला होता. त्यानंतर साखरपुडाही झाला. मात्र, दि. २५ मार्च रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास युवतीच्या वडिलांना सुनीलच्या नातेवाइकांनी फोन करून तुमच्या मुलीच्या पायात दोष आहे, असे कारण सांगत लग्नात बारा तोळे सोने देण्याची मागणी केली. वराच्या नातेवाइकाकडून आलेला फोन ऐकल्यानंतर युवतीच्या वडिलांनी साखरपुड्यावेळी असे काही ठरले नव्हते, असे सांगितले. त्यावेळी लग्न मोडण्याची धमकी सुनीलच्या नातेवाइकांकडून मुलीच्या वडिलांना देण्यात आली. धमकी दिल्याप्रमाणे मुलाकडील मंडळींनी लग्न मोडल्यानंतर संबंधित युवतीच्या वडिलांनी कऱ्हाड तालुका पोलिसात सुनील कदम याच्यासह चौघांविरूद्ध तक्रार दिली. त्यानुसार त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार एस. के. फडतरे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
वाग्दत्त वरासह चौघांवर गुन्हा दाखल
By admin | Updated: April 6, 2015 01:30 IST