सातारा : फलटणहून पाटण येथे निवडणूक कर्मचा-यांना घेऊन जाणा-या एसटी बसला शेंद्रे, ता. सातारा येथे रविवारी सकाळी अपघात झाला. यामध्ये चारजण जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, फलटण परिसरातील निवडणूक कर्मचा-यांना नेण्यासाठी रविवारी सकाळी एसटी बस गेली होती. तीस कर्मचा-यांना घेऊन एसटी पाटण येथे निघाली होती.शेंद्रे, ता. सातारा येथे एसटी पोहोचल्यानंतर स्कूल बस अचानक समोर आल्याने चालकाने डावीकडे एसटी वळवली. त्यामुळे पाठीमागून आलेल्या लक्झरी बसने एसटीला जोरदार धडक दिली. यामध्ये चार निवडणूक कर्मचारी जखमी झाले. या अपघातानंतर जखमींना तत्काळ जवळच्याच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच लक्झरी बसमधील इतर प्रवासीही किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक पूर्ववत केली.
निवडणूक कर्मचा-यांच्या एसटीला अपघात; चार जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 14:34 IST