नागठाणे : काशीळ (ता. सातारा) येथे पिकअप जीपचा टायर फुटल्याने अपघात झाला. हा अपघात गुरुवारी दुपारी झाला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथून गोडेतेलाचे डबे भरून पिकअप जीप कऱ्हाड येथे निघाली होती. दुपारी काशीळ हद्दीत या पिकअप जीपचा पाठीमागील टायर फुटल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने जीप महामार्गावर पलटी झाली. यावेळी गाडीतील तेलाचे काही डबे महामार्गावर पडल्यामुळे फुटल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणावर तेल सांडले होते. त्यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक खोळंबली. घटनेची माहिती मिळताच महामार्ग मदत पथकाचे दस्तगीर आगा, जितेंद्र भोसले व सिकंदर उघडे यांनी घटनास्थळी धाव घेत महामार्गावर सांडलेल्या गोडेतेलावर माती टाकून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची सायंकाळी उशिरापर्यंत बोरगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली न्हवती.