कुडाळ : गेली काही दिवसांत अवकाळी व चक्रीवादळामुळे परिसरात पाऊस झाला. तसेच मॉन्सूनपूर्व पावसाने भागात आता चांगलीच हजेरी लावल्याने जमिनीत मशागतींच्या कामासाठी पुरेशी ओल निर्माण झाली आहे. यामुळे मशागतींच्या कामांना गती आली आहे.
खरीप हंगामासाठी सध्या शेतकरी शेतात बैल तसेच ट्रॅक्टरच्या मदतीनंतर कुळवणी, फणणीची कामे करताना पाहायला मिळत आहे. उन्हाळ्यात शेतीची नांगरट करून जमीन चांगली तापली जाते. मातीची उलथापालथ होऊन तणांचाही नाश होतो. यानंतर अवकाळी व माॅन्सूनपूर्व पावसामुळे शेतातील ढेकळे विरघळून जातात. योग्य वापसा मिळाल्यानंतर शेतकरी पेरणीपूर्व मशागत करून पेरणीसाठी आता शेतजमीन तयार करत आहे.
सध्याच्या यांत्रिक युगात पूर्वीप्रमाणे शेतीकामासाठी बैलजोडीही दिसत नाही. तरीही काही ठिकाणी आजही पारंपरिक बैलाच्या मदतीनेच शेतीची कामे होत आहेत. यांच्या मदतीनेच मशागतीची कामेही सुरू आहेत. पश्चिम भागातही भाताची पेरणी केली जात आहे. खरीप हंगामात प्रामुख्याने सोयाबीन, भात, भुईमूग, कडधान्य आदी पिकांचे उत्पादन घेतले जाते. तसेच उसाबरोबरच आल्याचीही लागवड होत आहे. सध्या या सर्वच पिकांसाठी मशागतींच्या कामाने वेग धरल्याचे सगळीकडे पाहायला मिळत आहे.
(कोट)
जमिनीत चांगला वापसा आला असून, खरिपाची पेरणीपूर्व मशागतीसाठी वातावरण चांगले आहे. या हंगामात प्रामुख्याने सोयाबीन, भुईमूग, कडधान्य आदी पिकांचे उत्पादन घेतले जाते. सध्या शेतात फणणीची कामे सुरू केली आहेत. पेरणीसाठी शेतीची पूर्वमशागत केली जात आहे. मेहनतीची कामे पूर्ण होऊन येत्या आठ-दहा दिवसांत पेरणीही होईल. या वर्षी दरवर्षीपेक्षा माॅन्सूनपूर्व पावसाने लवकर हजेरी लावल्याने शेतीकामांना गती मिळाली आहे.
-मंगेश नवले, शेतकरी
०४कुडाळ
फोटो: जावळी तालुक्यात खरिपाच्या पेरणीपूर्व मशागतींची कामे शेतकरी करीत आहे.