सातारा : श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली कोयना प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन गेल्या २८ दिवसांपासून सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने या आंदोलनाकडे डोळेझाक केली असल्याने संतप्त आंदोलकांनी सोमवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान, मंगळवारी प्रधान सचिवांसोबत होणाऱ्या बैठकीनंतरही निर्णय झाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे कार्यकर्ते चैतन्य दळवी यांनी सांगितले.
काेयना प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न ६४ वर्षे उलटून गेली तरी लोंबकळत पडला आहे. धरणग्रस्तांचे विकसनशील पुनर्वसन बाजूलाच पण साधे पुनर्वसनही होऊ शकले नाही, याविषयी प्रशासनाला कोणतेच सोयरसूतक नाही, उलट प्रकल्पग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम प्रशासनाने केले आहे.
कोयना प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन रखडले आहे. २०१८ आणि २०१९ला तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या बैठकीत निर्णय झाले, तेव्हा महामारी, साथ किंवा कोरोना नव्हता. प्रशासनाने प्रामाणिकपणे या दहा वर्षांच्या विलंबाबद्दल दिलगिरी व्यक्त करणे सोडाच, त्याउलट प्रकल्पग्रस्तांचे संकलन रजिस्टर करून जमीन वाटप सुरु केलेले नाही.
दरम्यान, मंगळवार, दि. १५ रोजी प्रधान सचिवांच्या उपस्थितीत याप्रकरणी बैठक होणार आहे. या बैठकीला धरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर उपस्थित राहणार असून, या बैठकीमधून प्रश्न सुटण्याची धरणग्रस्तांना अपेक्षा आहे.
गरिबांना आंदोलनाची हौस नाही...
कोणतीही गरीब माणसे ज्यांना जगण्यासाठी दररोज संघर्ष करावा लागतो, ते सुखासुखी आंदोलनाचा निर्णय घेऊ शकत नाहीत. कोयना प्रकल्पग्रस्तांनी सुरू केलेला लढा हा कोणताही पर्याय उरलेला नसल्यामुळेच सुरू केला आहे. त्यांना एवढेच ठरवायचे आहे की, महामारीने मरायचे, उपासमारीने मरायचे की लढून मरायचे. पहिल्या टप्प्यात एकवेळचे अन्नत्याग आता तर दोन्हीवेळेचे अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला असल्याने प्रशासनाने आतातरी निर्णय घ्यावा, अशी मागणी चैतन्य दळवी यांनी केली आहे.
फाेटो नेम : १५ कोयना
फोटो ओळ : कोयना भरे (ता. भिवंडी) येथे सोमवारपासून श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने अन्नत्याग आंदोलन सुरु करण्यात आले आहे.