सातारा : सात वर्षांपूर्वीच्या खंडणी प्रकरणात अभिजित बिचुकलेचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला. गुन्हा जुना आहे, बिग बॉसच्या राऊंडमधून बाहेर पडल्यानंतर बिचुकले पुन्हा फरार होईल व त्याचा परिणाम या केसवर होईल, असा निष्कर्ष नोंदवत न्यायालयाने हा जामीन फेटाळल्याचे सरकार पक्षातर्फे सांगण्यात आले.बिग बॉस सिझन २ मधील अभिजित बिचुकलेला धनादेश न वटल्याप्रकरणी सातारा पोलिसांनी दि. २१ जून रोजी मुंबई येथून अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने जामीन मंजूर केला. दरम्यान, २०१२ मध्ये बिचुकलेवर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. त्यासाठी सातारा शहर पोलिसांनी बिचुकलेला अटक केली होती. या गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी बिचुकलेने न्यायालयात अर्ज केला होता. शुक्रवारी सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने जामीन फेटाळला.सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अॅड. मिलिंद ओक यांनी युक्तिवाद केला. अभिजित बिचुकले यांनी खंडणीची मागणी केली होती, ती वसूल केली नाही. तसेच जीवे मारणे व अॅट्रॉसिटीची धमकी दिलेली. त्यांनी बिग बॉस स्पर्धा संपल्यानंतर तातडीने न्यायालयात हजर व्हावं. न्यायालयातील केसेस, आरोप, बचाव याबद्दल त्यांनी स्पर्धेत खेळताना उथळपणे बोलण्याचे विधान करू नये, त्यामुळे बिचुकलेंना जामीन देण्यास हरकत नाही, असा सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला होता.बचाव व सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश सी. एस. दातीर यांनी बिचुकलेंचा जामीन अर्ज फेटाळला. बिचुकले फरार असून, बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर पुन्हा फरार होईल. खंडणीची केस जुनी आहे. ती लवकर निकाली काढता येणार नाही, असा निष्कर्ष नोंदवत न्यायालयाने जामीन फेटाळल्याचे सरकार पक्षातर्फे सांगण्यात आले.
अभिजित बिचुकलेचा जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 23:26 IST