शिरवळ : शिरवळ पोलिसांनी केवळ दोन तासांमध्ये तब्बल १२३ विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली. शिरवळ पोलिसांनी शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने ही मोहीम राबवत विनाकारण फिरणाऱ्यांची त्वरित आरटीपीसीआर व अँटिजन चाचणी केली. यावेळी कोरोनाबाधित आढळल्यास नागरिकांची रवानगी थेट रुग्णालयात व कोरोना केअर सेंटरमध्ये करण्यात येत आहे.
यामध्ये शिरवळ पोलीस स्थानकाच्या पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू अहिरराव, पोलीस हवालदार प्रकाश फरांदे व शिरवळचे पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांनी जबरदस्त धक्कातंत्र अवलंबले. केवळ दोन तासांमध्ये तब्बल १२३ विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना तपासणी करत शिरवळसह परिसरात खळबळ उडवून दिली.
शिरवळ येथील गावामध्ये प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यावर शिरवळचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॅ. सतीशकुमार सरोदे, डॉ. प्रीतम कांबळे-सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने शिरवळ व परिसरात विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाईची मोहीम राबविली. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची थेट जागेवरच कोरोना चाचणी करण्यास सुरूवात केली. यावेळी तपासणी करण्यास नकार देणाऱ्या व वाद घालणाऱ्या नागरिकांना शिरवळ पोलिसांनी कायद्याचा चांगलाच हिसका दाखविल्याने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना चांगलीच जरब बसली.
या मोहिमेचे जोरदार स्वागत शिरवळकर नागरिकांमधून होत असून, या कारवाईमध्ये सातत्य राहिल्यास लवकरात लवकर शिरवळ हे कोरोनामुक्त होण्यास मदत होईल, असा विश्वास शिरवळकर नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी शिरवळ पोलिसांकडून करण्यात येत आहे. शिरवळचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना जरब बसवताना कायद्याचा धाक निर्माण व्हावा, याकरिता त्वरित कोरोना तपासणी मोहीम शिरवळ पोलिसांमार्फत राबविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांनी केले आहे.
---
चौकट
एका बाधिताची रवानगी थेट रुग्णालयात
शिरवळ येथे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. यामध्ये पहिल्याच दिवशी तब्बल १२३ जणांंची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. गुरुवारी दुसऱ्या दिवशी शिरवळच्या पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांच्या नेतृत्वाखाली कोरोना तपासणी मोहीम राबविली असता, विनाकारण फिरणाऱ्या १०४ नागरिकांची कोरोना तपासणी केली. यामध्ये एक युवक कोरोनाबाधित निघाला. त्याची थेट रवानगी रुग्णालयात करण्यात आली आहे. शिरवळ पोलिसांनी राबविलेल्या या मोहिमेचा धसका विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांनी घेतला आहे. यामुळे तपासणी नाक्याकडे जाण्याचे नागरिक टाळत आहेत.
०३ शिरवळ-कोरोना
शिरवळ येथे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची गुरुवारी जागेवरच कोरोना तपासणी करण्यात आली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, रुग्णकल्याण समिती सदस्य उमेश गिरमे, पोलीस हवालदार प्रकाश फरांदे उपस्थित होते. (छाया : मुराद पटेल, शिरवळ)