कोयनानगर : कोयनानगर येथील बसस्थानकाजवळ डिस्कवर कोयना पथकाच्या सदस्यांना दुर्मिळ असणारा पट्टेरी पोवळा जातीचा विषारी साप आढळला.येथील बसस्थानक परिसर हा नेहमीचे वर्दळीचे असून येथील रिक्षा थांब्याजवळ साप दिसल्याने मोठी गर्दी झाली. डिस्कवर कोयना पथकाचे वन्यजीवरक्षक निखिल मोहिते यांना समजताच त्यांनी तत्काळ तिथे जाऊन पाहिल्यानंतर त्यांनाही आश्चर्य वाटले. तीन फूट लांबीचा दुर्मिळ पट्टेरी पोवळा साप होता. मोहिते यांनी सापाला सुरक्षित पकडून वनविभाग अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली निसर्गात मुक्त केले.यावेळी वन्यजीवचे वनक्षेत्रपाल संदीप कुंभार, संदीप जोपले, डिस्कव्हर कोयना टीमचे अभ्यासक संग्राम कांबळे, निखिल मोहिते, सागर जाधव, महेश शेलार, नरेश शेलार, विकास माने आदी उपस्थित होते.स्थानिक लोक 'रात साप' या नावाने ओळखतातवन्यजीव अभ्यासक विकास माने यांनी सांगितले की, ‘पट्टेरी पोवळा हा एक दुर्मिळ साप असून तो पश्चिम घाटात जास्त आर्द्रता असणाऱ्या ठिकाणी आढळतो. कोयना परिसरात स्थानिक लोक याला रात साप या नावाने ओळखतात. हा साप लहान सापांना खातो. याला धोका वाटल्यास शेपटी गोलाकार गुंडाळून शेपटी खालच्या लालसर भागाचे प्रदर्शन करून शत्रूला इशारा देतो. याचे वास्तव्य जंगलातील पालापाचोळ्याखाली असते.या सापाची मादी पावसाळ्यात तीन ते सहा अंडी घालते. हा साप दुर्मिळ असल्यामुळे या सापाच्या दंशाचे प्रमाणही कमी आहे. याचा दंश झाल्यास त्या ठिकाणी जळजळ होऊन सूज येणे व श्वास घेण्यास अडचण होणे ही लक्षणे दिसून येतात.
कोयनेत आढळला दुर्मिळ पट्टेरी पोवळा जातीचा विषारी साप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 17:38 IST