साताऱ्यात शिवजयंती सोहळा थाटात, शिवरायांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

By सचिन काकडे | Published: February 19, 2024 06:15 PM2024-02-19T18:15:20+5:302024-02-19T18:16:35+5:30

शंभर फुटी भगव्या ध्वजाचेही अनावरण

A helicopter showered flowers on the statue of Shivaji Maharaj in Satara | साताऱ्यात शिवजयंती सोहळा थाटात, शिवरायांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

साताऱ्यात शिवजयंती सोहळा थाटात, शिवरायांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

सातारा : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शाहूनगरीत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली. पोवई नाक्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला नक्षत्रच्या संस्थापक अध्यक्ष दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते पाच नद्यांच्या पाण्याने जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक घालण्यात आला. यानंतर पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. हजारो शिवभक्तांनी हा देदीप्यमान सोहळा याची देही याची डोळा अनुभवला.

ब्रह्मवृंद्धांच्या मंत्रपठणानंतर सोमवारी सकाळी जलाभिषेक विधीला सुरुवात झाली. दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते पाच नद्यांच्या पाण्यांनी विधिवत पद्धतीने छत्रपतींच्या पुतळ्याला  जलाभिषेक व दुग्धाभिषेक करण्यात आला. शिवज्योतीचे पूजन करून छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर शिवभक्तांच्या अस्मितेचे प्रतीक असणाऱ्या शंभर फुटी भगव्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले. या अनावरणानंतर 'छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी..जय शिवाजी' अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.

सकाळी सव्वानऊ वाजता शिवरायांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी शिवभक्तांनी गगनभेदी घोषणा देत युगपुरुषाला अभिवादन केले. शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शिवभक्तांची सकाळपासूनच पोवई नाक्यावर रेलचेल सुरू होती. यावेळी प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजित बापट, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, माजी नगरसेवक निशांत पाटील, वसंत लेवे, प्रशांत आहेरराव, माजी नगराध्यक्ष स्मिता घोडके, सुजाता राजेमहाडिक, सुनील काटकर, पंकज चव्हाण आदी उपस्थित होते.

Web Title: A helicopter showered flowers on the statue of Shivaji Maharaj in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.