येथील बस आगारात पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी वाहतूक निरीक्षक किशोर जाधव, सहाय्यक वाहतूक निरीक्षक बिस्मिल्ला सय्यद, वाहतूक निरीक्षक वैभव साळुंखे, वरिष्ठ लिपिक सचिन महाडिक, वाहतूक नियंत्रक मन्सूर सुतार, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.
आगारप्रमुख विजय मोरे म्हणाले, शाळा तसेच महाविद्यालये सुरू झाली असून, विद्यार्थी व प्रवासी यांच्यासाठी सोमवारपासून एसटी फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने वडोली निळेश्वर-धानाई, वडगांव-घोणशी प्रत्येक तासाला तर काले-मसूर प्रत्येक अर्धा तासाने सुरू केली जाईल. मसूर येथून किवळ, निगडी सकाळी ८ ते ५ पूर्वीप्रमाणे सुरू होईल. रेठरे बुद्रूक, गलमेवाडी, कासारशिरंबे, कालगाव या मुक्कामी एसटी सुरू होतील. तसेच बहुले, धावरवाडी ही बस सुरू केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना पासेसची सोय करण्यात आलेली असून, त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा. यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालय, गाडगे महाराज महाविद्यालय व उंडाळे येथेही विद्यार्थ्यांना पास देण्याची सोय केलेली आहे. सध्या ४८२ एसटी फेऱ्या चालू आहेत. मुंबईत लोकल बंद असल्याने कऱ्हाड आगाराच्या जवळपास १०० गाड्या मुंबई बेस्टला वापरण्यासाठी दिल्या गेल्या आहेत. त्यापैकी आपल्याला जसजशा गाड्या परत मिळतील तसतशा आपण कऱ्हाड आगाराला गाड्या वाढवणार आहोत. आता सध्या आगाराकडे ८५ गाड्या असून, त्या सर्व सुरू आहेत.
- चौकट
संघटनेचा हस्तक्षेप टाळणार
कऱ्हाड आगारात संघटनेचा कोणताही हस्तक्षेप विचारात घेतला जाणार नाही. कोणत्याही संघटनेची कामात ढवळाढवळ चालू दिली जाणार नाही. कर्मचाऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही. कर्मचाऱ्यांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा त्याच्यांवर कारवाई केली जाईल. तसेच जे अधिकारी पदाचा तसेच अधिकारांचा गैरवापर करतील त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. कोणावर अन्याय होऊ नये यांची काळजी घेणार असल्याचे आगार व्यवस्थापक विजय मोरे यांनी सांगितले.