सातारा/वाळवा : १० सप्टेंबर १९४४ ची ती पहाट.. सातारा जेलमध्ये पहाटेचा उजेड पसरत असतानाच क्रांतीचा सूर्यही तेजाळत होता. १८ फुटी भिंतीवरून पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी यांनी स्वातंत्र्य चळवळीच्या यज्ञासाठी घेतलेली ती उडी आजही अंगावर शहारे आणते. सातारा जेल फोडण्याच्या घटनेला बुधवारी ८१ वर्षे पूर्ण होत आहेत.वाळव्यात (जि. सांगली) २८ जुलै रोजी झालेल्या सभेत नागनाथ अण्णांनी ‘स्वातंत्र्य दूर नाही, तयार राहा!’ असा जाज्वल्य संदेश दिला. या भाषणाने गावकऱ्यांच्या अंगात क्रांतीचे रक्त सळसळले; पण विश्वासघातकी खबऱ्यामुळे पोलिसांनी अण्णांना अटक केली. अण्णांना कैद झाल्याचे कळताच वाळव्याच्या जनतेने चुली विझवून आपले दु:ख व्यक्त केले. रडणाऱ्या लोकांना अण्णांनी ‘मी परत येतो’ असा दिलासा दिला आणि ते निर्धाराने तुरुंगात गेले. प्रथम इस्लामपूर जेलमध्ये ठेवले, तिथून पलायनाचा बेत आखला. मात्र, चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागून योजना उधळली. अखेर साताऱ्याच्या तटबंदी जेलमध्ये हलवण्यात आले. तिथे अण्णांनी कैद्यांत मिसळून धाडसी आराखडा आखला. ‘इथे जिवंत असून मेल्यासारखे वाटते, म्हणून तुरुंग फोडणारच!’ असा ठाम निर्धार करून प्रसंगी गोळी झेलण्याची मानसिकता करीत अण्णांनी नियोजन केले आणि अमलातही आणले.
म्हणून १० सप्टेंबर शौर्य दिन..अण्णा सातारा जेलमधून बाहेर पडल्याने स्वातंत्र्यसैनिकांचा आत्मविश्वास उंचावला. ब्रिटिश सत्तेला मोठा धक्का बसला. या घटनेने संपूर्ण क्रांती चळवळीत नवीन ऊर्जा निर्माण झाली. आज त्या उडीला ८१ वर्षे पूर्ण झाली. दरवर्षी १० सप्टेंबर ‘शौर्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. सातारा जेलचा तट आजही उभा आहे आणि त्या निर्भय झेपेचा प्रसंग आजही काळजाला भिडतो.
...अन् तो क्षण उजाडला
- रविवार, दि.१० सप्टेंबर १९४४ रोजी सातारा जेलमधील कैद्यांना पहाटे अंघोळीला नेण्यात आले. सहकाऱ्यांच्या खांद्याचा आधार घेत अण्णा तटावर चढले.
- पुढे १८ फूट खोल दरी, मागे बंदुकींचा दबा धरून असलेले शिपाई. तरीही त्यांनी क्षणार्धात उडी मारली! हाताला किरकोळ जखम झाली; पण चपळाईने ते दूर्वा उपटू लागले. गणेशोत्सवाचा काळ असल्याने जणू गणपतीसाठी हराळी घेत आहेत, असा भास त्यांनी निर्माण केला.
- गोंधळलेल्या पोलिसांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. बेधडक चालत अण्णा थेट सोमवार पेठेत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या घरी पोहोचले.