सातारा : देवभूमी उत्तराखंडमध्ये ढगफुटीसदृस्य पावसामुळे नद्यांना प्रचंड पूर आणि दरडी कोसळून वाहतुकीचे रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे यमुनोत्री धामच्या जानकीचट्टी गावात १५० मराठी पर्यटक अडकून पडले आहेत त्यात सातारा जिल्ह्यातील सहा पर्यटक अडकले आहेत. सर्वजण झांजवड (ता. महाबळेश्वर) येथील एकाच कुटुंबातील आहेत. सर्वजण सुखरूप असल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे.याबाबत माहिती अशी. उत्तराखंड राज्यातील उतरकाशी जिल्ह्यात सिलाईबंद याठिकाणी येथे दि. ३० जूनला अतिवृष्टीमुळे चारधाम रस्ता वाहून गेला. त्यामुळे भारतातले ७७७ पर्यटक अडकले आहेत. यामध्ये झांजवड, ता. महाबळेश्वर येथील आकाश संभाजी जाधव (वय ३५) संभाजी देवजी जाधव (६०), आशिष संभाजी जाधव (३७), कल्पना संभाजी जाधव (७४), नीलम आशिष जाधव (३६), नियती आकाश जाधव (२८) या पर्यटकांचा समावेश आहे.दरम्यान, घटनास्थळी एनडीआरएफ आणि उत्तराखंडचे एसडीआरएफ, पोलिस, महसूल कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. रस्ता पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. जानकीचट्टी देचे सर्व पर्यटक सुरक्षित आहेत. या ठिकाणी डॉक्टर, भोजन व राहण्याची व्यवस्था उत्तराखंड सरकारने केली आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत भूस्खलन भागातून चालत मार्गस्थ करून पुढे वाहनातून ह्र्षिकेशपर्यंत उत्तराखंड सरकार व्यवस्था करण्यात येणार असल्याचे समजत आहे. जानकी चट्टी भाग दुर्गम असल्याने नेटवर्क संपर्क साधण्यास अडथळा होत आहे. त्यामुळे वायरलेस सेटने संपर्क सुरू आहे साताऱ्यातील नागरिकही याबा प्रशासनाकडे चौकशी करत आहेत.
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून विचारपूसउपमुख्यमंत्री शिंदे यांनी आकाश जाधव यांना फोन करून नाव गाव विचारून तेथील परिस्थिती विचारली. तसेच सुरक्षित जागी आहात काय याची विचारणा केली, तसेच मुख्यमंत्र्यांशी बोलून मदत पोहोचवतो, असे सांगून दिलासा दिला. तसेच मदत लागली तर थेट फोन करण्यास सांगितले.
यमुनोत्री धाम यात्रेसाठी आलो. तथापि प्रचंड पुरामुळे रस्ते वाहून गेले व मंगळवारी सकाळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर उपमुख्यमंत्री यांनी आमच्याशी तसेच उत्तराखंड सरकारशी संपर्क साधला. - आकाश जाधव, पर्यटक